फसवणुकीच्या गुन्ह्यानंतर सोनाक्षी सिन्हाच्या अटकेवर स्थगिती

अलाहाबाद : वृत्तसंस्था – ३७ लाखांची मोठी रक्कम घेऊन देखील कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह पाच जणांवर उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . याप्रकरणी आता सोनाक्षीच्या अटकेवर अलाहाबाद न्यायालयाकडून स्थगिती आणण्यात आली आहे. न्यायाधीश नहीद अरा मुनीस आणि विरेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने ही स्थिगिती आणली असून पोलिसांना अधिक तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने दिलेल्या स्थिगितीनंतर पोलिसांना या प्रकरणी अधिक तपास करावा लागणार असून सोनाक्षीलाही चौकशीदरम्यान पोलिसांना सहाय्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण ? – दिल्लीमध्ये 30 सप्टेंबर 2018 रोजी इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुरस्कार वितरणासाठी सोनाक्षी हजर राहणार होती. यासाठी प्रमोद शर्मा यांनी टॅलेंट फुल ऑन कंपनीसोबत करार केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, सोनाक्षीच्या सचिवाशी बातचीत केल्यानंतर 3७ लाख रुपये तिच्या खात्यात जमा करण्यात आले. परंतु तिने अखेरच्या क्षणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला.

त्यानंतर शो रद्द केल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद शर्मा यांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी विष प्राशन केलं होतं. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला .

दुसरीकडे पोलिसांच्या माहितीनुसार, तपास पूर्ण झाल्यानंतर सोनाक्षीसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने दबाव टाकण्यासाठी विष प्राशन केलं होतं. सोनाक्षीसोबतच टॅलेंट फुल ऑफ कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धूमिल ठक्कर, अॅडगर सकारिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like