प्रियंका गांधींनी घडवलं माणूसकीचं दर्शन ; ‘त्या’ मुलीला दिलं स्वतःचं ‘विमान’

प्रयागराज : वृत्तसंस्था – लोकसभा प्रचार देशभरात जोरात सुरु आहे. या सगळ्या रणधुमाळीत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे. प्रयागराजमध्ये त्यांनी प्रचार करत असताना एका आजारी मुलीच्या उपचारासाठी स्वतःचे विमान उपलब्ध करून दिले. दिल्लीत एम्स रुग्णालयात त्या मुलीला उपचारासाठी दाखल करत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

प्रियांका गांधी या प्रयागराज येथे प्रचारासाठी आल्या असताना त्यांना कार्यकर्त्यांकडून या मुलीच्या आजाराबाबतची माहिती मिळाली. त्या मुलीवर त्याच शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना इतका मोठा खर्च करणे शक्य नव्हते. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुलीच्या कुटुंबियांना शहरात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी सल्ला दिला होता. ही माहिती कळताच प्रियंका गांधी यांनी त्या मुलीला तातडीने दिल्लीत हलविण्याचा आदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिला. यावेळी काँग्रेस नेते राजीव शुक्ला, हार्दिक पटेल, मोहम्मद अझहरुद्दीन, प्रियांका गांधी यांच्यासोबत होते. प्रियंका गांधी त्या मुलीची एम्समध्ये जाऊन भेट घेणार आहेत आणि काँग्रेस त्या मुलीच्या उपचाराचा खर्चही उचलणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात पाच टप्प्याचे मतदान झाले असून, आणखी दोन टप्प्यांचे मतदान शिल्लक असून उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजेच ८० जागा आहेत. सगळ्याच पक्षांनी तिथे आपला जोर लावला आहे.