शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख वादाच्या भोवऱ्यात ?

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत. ऊसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचे शेतक-याने म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांने शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचे आमंत्रण देतोय असे म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतेय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडू देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचे ठरवले आहे. इतकचे नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM यांनी दखल घेतली नाही तर ऊसात आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेले मंत्रिपद शेतकऱ्यांसाठी फायद्याचे नाही. शंकरराव गडाख यांच्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऋषिकेश शेटे या शेतकऱ्याने केले आहे.

मुळा सहकारी साखर कारखाना हा शंकरराव गडाख यांच्या अख्यारित आहे. शंकरराव गडाख यांच्या कारखान्यात भ्रष्टाचार होतो, शेतकऱ्यांना प्यायला पाणी मिळत नाही आदी प्रश्नावर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात पॅनेल उभा केला होता. त्यामुळे गडाख यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.