‘कोरोना’बाधितांचा मृतदेह ठेवण्याच्या बॅगमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, आता भाजपानं केली नवी मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई मध्ये एकीकडे कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच कोरोना संसर्गित रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॅगच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप सर्व स्तरातून होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ते कंत्राट रद्द केले आहे. मात्र, हे कंत्राट देण्याचा प्रयत्न करीत घोटाळा करण्याचा प्रयत्न कोणी केला? हे समोर आलं पाहिजे अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

कोरोना संसर्गित रुग्णांचे मृतदेह ठेवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॅगचे कंत्राट वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालं होतं. या कंपनीकडून एका प्लास्टिक बॅगची किंमत ६७१९ रुपये इतकी ठरवण्यात आली होती. मात्र, हे दर अवाजवी असल्याची तक्रार भाजपासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. या बॅगची किंमत २५० ते १२०० रुपये पर्यंत असून शकते मग ६७१९ रुपयांचा आकडा कुठून आला असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या खरेदी विभागाने एप्रिल महिन्यात पहिली निविदा काढत १.१५ कोटी रुपयांच्या २२०० बॅग्स खरेदी केल्या होत्या. परंतु, आता हे कंत्राट रद्द करण्यात आलं असून, चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी होणार का हे पाहावं लागेल.

महानगरपालिकेच काय आहे म्हणणं?

केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह ‘बॉडी बॅग’ मध्ये ठेवून अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसाठी करण्यात आलेल्या या बॉडीबॅग्जच्या खरेदीच्या अनुषंगाने समाज माध्यमांवरती चुकीची चर्चा सुरु आहे. तसेच भविष्यात ‘बॉडी बॅग्ज’ची संभाव्य गरज लक्षात घेऊन दिनांक २३ मे २०२० रोजी काढण्यात आलेल्या निविदेला तांत्रिक दृष्टया सक्षम संस्थाचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने सदर निवड प्रक्रिया रद्द करुन नव्याने निविदा काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.