सेनेसोबत युती भाजप आमदारांच्या मुळावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना भाजप युती आज घोषित होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने युती करण्यास राजी होताना भाजपपुढे टाकलेल्या अटी पैकी एक अट भाजप मधील काही आमदारांची डोकेदुखी वाढवणारी आहे. शिवसेनेने भाजप सोबत युती करताना पुण्यातील कोथरूड आणि हडपसर मतदारसंघ शिवसेनेसाठी मागितले आहेत. तर याच बरोबर नाशिक शहराचे दोन मतदारसंघ हि शिवसेनेने मागितले आहेत. शिवसेनेने जे मतदारसंघ मागितले आहेत तेथे भाजपचे आमदार आहेत. अशा प्रसंगात भाजप कोण-कोणत्या आमदारांच्या उमेदवारीला तिलांजली देणार हे पाहण्यासाठी अद्याप काही महिन्यांचा अवकाश आहे.

पुणे शहरातील या मतदारसंघावर शिवसेनेचा डोळा
भाजपने २०१४ च्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत पुणे शहरातील आठ हि जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला पुणे शहरात कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित पराभव मिळाला होता. कोथरूड मतदारसंघातून भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला. तर हडपसर मतदारसंघातून भाजपच्या योगेश टिळेकर यांनी शिवसेनेच्या महादेव बाबर यांचा पराभव केला. दोन्ही ठिकाणी २००९च्या निवडणुकीत युतीचे म्हणजे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. म्हणून पराभवाची सल भरून काढण्यासाठी शिवसेनेने भाजपकडे या दोन मतदारसंघांची मागणी केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिकच्या या मतदारसंघाची शिवसेनेने केली आहे मागणी
नाशिक शहरात विधानसभेच्या तीन जागा आहेत या ठिकणी भाजपने तिन्ही जागा मागच्या निवडणुकीत जिंकल्या आहेत. या निवडणुकीत या पैकी दोन जागांची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने या तीन पैकी नेमके कोणते दोन मतदारसंघ मागितले हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. सध्या नाशिक मध्य मधून प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे, नाशिक पूर्व मधून बाळासाहेब सानप असे तिन्ही भाजपचे आमदार आहेत. मात्र त्या तिन्ही आमदारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार राहणार आहे.

शिवसेनेच्या मनात असणारे महाराष्ट्रातील इतर मतदारसंघ
शिवसेनेशी युती झाल्यानंतर सर्वात गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे भोसरी विधानसभेचे करायचे काय? कारण त्या ठिकाणी भाजपमध्ये गेलेले अपक्ष आमदार महेश लांडगे यांना भाजपची उमेदवारी पाहिजे आहे. तर २००९ मध्ये अवघ्या काही मतांनी विलास लांडे यांच्या कडून पराभव पत्करावा लागलेल्या सुलभा उभाळे यांच्या पराभवाची कसर भरून काढण्यासाठी शिवसेना या जागेची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तिकडे सोलापूर जिल्ह्यात मोहळ मतदारसंघासाठी भाजपच्या लक्ष्मण ढोकळे यांचे नाव चर्चेत आहे. तो मतदारसंघ युती मध्ये शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर तशीच काहीशी स्थिती बार्शीच्या विधानसभा मतदारसंघाची आहे. बार्शीची जागा युतीच्या परंपरेत शिवसेने कडे आहे. तेथील गतवेळीचे शिवसेना उमेदवार राजेंद्र राऊत हे आता भाजप मध्ये गेले आहेत. त्या ठिकाणी सेनेकडे भाऊसाहेब आंधळकर हे तगडे उमेदवार आहेत. तर भाजप माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाठी या मतदारसंघाचा आग्रह धरण्याची शक्यता आहे.

एकंदरच भाजप शिवसेना युती होणे हे प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणाची समीकरणे चुकवण्या सारखेच आहे. मात्र एकूणच मतांचे विभाजन टाकण्यासाठी युतीचा मार्ग सेना भाजपने आखला आहे. परंतु युतीच्या जागा वाटपात दोन्ही पक्षांना बंडाळीचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता आहे.