बिहारमध्ये सोबत लढायचे की स्वतंत्र, रामविलास पासवान आज घेणार निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेल्या लोक जनशक्ती पार्टीने आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत बिहार विधानसभा निवडणूक एनडीएसोबत लढायची की, स्वतंत्र याचा निर्णय घेतला जाणार आहे.

बिहार विधानसभा निवडणूक एनडीएतील घटक पक्ष मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. मात्र, एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. लोक जनशक्ती पार्टी आणि संयुक्त जनता दल (जदयू) यांच्यातील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला आहे. लोजपा आणि जदयूचे नेते एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. त्यातच नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनाही सोबत घेतल्याने लोजपा नाराज आहे. नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान हे सरकारवर सातत्याने टीका करत आहे. सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबरोरच पासवान यांनी करोनाची हाताळणी, लॉकडाउन व पूरपरिस्थितीवरून नितीश कुमार यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे लोजपाने आता बिहार विधानसभा निवडणूक सोबत लढायची की स्वतंत्र यासंदर्भात विचार सुरू केला आहे. दिल्लीत ही बैठक होणार आहे.