भाजपाच्या खासदारानं लाल मिरची हवन अन् 7 बकर्‍यांचा बळी दिल्याचा काँग्रेसच्या आमदाराचा आरोप, होतंय मृत्यूचं भय

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमध्ये सध्या एका यज्ञाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे आमदार बृहस्पती सिंह यांनी असा आरोप केला आहे की, राज्यसभेतील भाजपाचा एक खासदार माझ्या मृत्यूसाठी यज्ञ करत आहे, लाल मिरचीपासून गेल्या 2 दिवसापासून हवन सुरू आहे. 7 बकऱ्यांचा बळीही दिला आहे. तर संबधित खासदारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. यज्ञ धार्मिक विधी असतो, यज्ञ करणे चुकीच नाही, पण आम्ही बृहस्पती सिंह यांच्या मृत्युसाठी कोणताही यज्ञ केला नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.

त्यामुळे सध्या छत्तीसगडच्या राजकारणात यज्ञाची ही राजकीय लढाई कधीपर्यंत सुरु राहील आणि याचा कोणाला फायदा होईल हे आगामी काळात दिसून येणार आहे. आमदार बृहस्पती सिंह यांना मंत्री न बनवता त्यांना एका विकास प्राधिकरणावर उपसंचालक म्हणून नेमण्यात आल्याने ते पक्षावर नाराज आहेत. या मुद्द्यावरून ते पक्षाला स्वत:सोबत उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

यानंतर कॉंग्रेसमधील काही नेत्यांनीही आमच्या आमदाराच्या मृत्युसाठी कोणी यज्ञ कस काय करू शकते? असा सवाल उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर आमदारांच्या दिर्घ आयुष्यासाठी त्यांच्या मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यकर्त्याकडून यज्ञ करण्याचे आयोजन केले जात आहे. यावरून भाजपा नेत्यांनी काँग्रेस आमदारावर निशाणा साधला आहे. आमदार स्वत:च्या मतदारसंघात रस्ते बनवू शकले नाही पण यज्ञ करण्यासाठी तयारी करत असल्याची टीका केली आहे.