रोजगारासाठी ‘त्यांना’ शहरात सकाळी ३ तास मुभा द्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शहरात मोठ मोठ्या हॉटेलची अतिक्रमणे असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने सकाळच्या वेळी पदपथाच्या कडेला टेबलवर नाश्ता विक्री करून रोजगार मिळविणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे मात्र ही कारवाई करण्याऐवजी सकाळी तीन तास मुभा देण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे शिक्षणासाठी मोठ्याप्रमाणावर विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एमपीएससी, यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थी मोठ्याप्रमाणावर पुण्यात वास्तव्यास आहेत. तसेच नोकरीनिमित्त बाहेरगावातील नागरिकही शहरात आहेत. सध्या महागाईच्या काळात नाश्ता, भोजन यांच्या किंमती पाहता, अनेकांना हॉटेलमध्ये जाणे परवडत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी पदपथाच्या कोपऱ्यावर छोटेसे टेबल मांडून अनेक छोटे व्यावसायिक नाश्ता उपलब्ध करून देत आहेत. त्यात अनेक बेरोजगार तरुण व्यवसाय करून स्वतःचा आणि कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत.

या खाद्य विक्रेत्यांवर मोठ्याप्रमाणावर बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी, नोकरदार अवलंबून आहेत किंवा हे छोटे खाद्य विक्रेते त्यांच्यासाठी आधारवड ठरत आहेत. मात्र या छोटे व्यावसायिकांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. वास्तविक आधीच रोजगाराचा प्रश्न बिकट असताना अशा छोट्या खाद्य पदार्थाचे टेबल मांडून रोजगार मिळवणारे आणि महागाईच्या काळात हॉटेलमध्ये महागडा नाष्टा करू न शकणाऱ्यांची एकप्रकारे कोंडी होत आहे.

मुळात शहरात अनेक हॉटेल्सची अतिक्रमणे आहेत. त्यावर कारवाई काय हा प्रश्न कायम आहे. मात्र अशारितीने छोटा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने बेरोजगारीला खतपाणी घातले जात आहे शिवाय बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांनाही वेठीस धरले जात आहे.

कायद्यानुसार कारवाई सर्वांवर होणे अपेक्षित असताना मोठे हॉटेल्सची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे यांना ‘अभय’ मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खाद्य पदार्थाचे छोटे टेबल मांडून रोजगार मिळवणाऱ्या आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या गरजू आणि गरीब वर्गाच्या नाश्ताची सोय पाहता, सकाळी सहा ते सकाळी नऊ यावेळेत या छोट्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायाला आपण मुभा द्यावी, त्यांच्यावर कोणतीही कारवाई महापालिकेमार्फत करू नये अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली असून त्यासंदर्भात ठराव सादर करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Loading...
You might also like