Lockdown in Maharashtra : शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र, लिहीलं – ‘Lockdown केलाच तर लोकांना 3 दिवसांचा वेळ द्यावा’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाची चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत सदस्यांनी देखील 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले आहे. यावर आता शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले आहे. राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर जनतेला तयारीसाठी किमान 3 दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर जनतेला तयारी करण्यासाठी 3 दिवसाचा वेळ द्यावा. जेणेकरून गरजेच्या वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळणार नाही आणि लॉकडाऊनचा उद्देश देखील सफल होईल. तसेच बाराबलुतेदार, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने काहीतरी सोय करावी. 3 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ज्यांना आपल्या गावी घरी जायचे आहे, त्यांची सोय करावी, त्यांना सूट द्यावी अशी मागणी गो-हे यांनी केली आहे. दरम्यान राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करायचा यावर कोरोना टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची खलबते सुरु आहेत. यात मुख्यमंत्री 8 दिवसांचा लॉकडाऊन म्हणत आहेत. तर टास्क फोर्सचे सदस्य 15 दिवसांच्या लॉकडाऊनच्या मताचे आहेत. यावर सविस्तर चर्चा करून आज किंवा उद्या निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.