‘अलमट्टी’ धरणावरुन मुख्यमंत्री फडणवीस, कर्नाटकचे CM येडियुरप्पा यांच्यात ‘तु तु – मै मै’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर सांगली परिसरात महापूर आला असून पुराच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना फोन करुन केली. मात्र, फडणवीस यांची मागणी अजूनतरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नसल्याचे दिसून येत आहे. अलमट्टी धरणातून तसेच कोयना धरणातून किती पाणी सोडावे, यावरुन या भाजपाच्या दोन मुख्यमंत्र्यांमध्ये ‘तु तु मै मै’ सुरु झाली आहे.

कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या सव्वा लाख क्युसेक पाण्यामुळे सांगली, कराड शहरे महापुरात अडकली आहेत. पुणे -बंगलुरु महामार्ग गेल्या दोन दिवसांपासून बंद पडला आहे. कोल्हापूरला आजवरचा सर्वात मोठा महापूर आला आहे. पुराचे पाणी ओसरायचे असेल तर त्यासाठी कृष्णा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा वेगाने होण्याची आवश्यकता आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडणे वाढविल्यास पुराचे पाणी कमी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे बेळगाव, विजापूर, रायचूर, कलबुर्गी, यादगीर या जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. अलमट्टी धरणात वेगाने पाणी येत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काही म्हणायच्या आत कर्नाटकातील पूर कमी व्हावा, यासाठी महाराष्ट्राने कोयनेतील विसर्ग कमी करावा अशी मागणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

इकडे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत अडकले आहेत. त्यामुळे टिका होऊ लागल्यावर ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले. बुधवारी ते मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
येडियुरिप्पा यांच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पूर परिस्थितीला कर्नाटक सरकारने आवश्यक तेवढे पाणी अलमट्टीतून न सोडल्याने निर्माण झाली आहे. अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक पाणी सोडावे अशी मागणी केली आहे.

मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीला आतापर्यंत तरी केराची टोपली दाखविली आहे.
अलमट्टी धरणातून सध्या २ लाख ४९ हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडण्यात येत आहे.
अलमट्टी धरणाची क्षमता १२३ टीएमसी इतकी असून बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता धरणात १०० टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरणात सध्या २ लाख २२ हजार ५४३ क्युसेक पाणी जमा होत आहे. महाराष्ट्रातून सोडण्यात येत असलेल्या प्रचंड पाण्यामुळे अलमट्टी धरण आज भरु शकते. त्यामुळे धरणातून अडीच लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

धरणात वेगाने पाणी जमा होत असल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला कोयनेतील विसर्ग कमी करावा अशी विनंती केली आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या पावसामुळे ते सध्या शक्य नाही. त्यामुळे अलमट्टी धरण वेगाने भरत असल्याने त्याचा फुगवटा वाढत चालला आहे. त्याचा परिणाम सांगली शहरात शिरलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्राकडून होऊ लागली आहे. मात्र, धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले तर धरणापुढील भागात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल, असे कर्नाटकाचे म्हणणे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –