आरोप झालेला हा अभिनेता दिसणार #MeToo वरील चित्रपटात जजच्या भूमिकेत

मुंबई : वृत्तसंस्था – गतवर्षी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिम सुरु झाली. या मोहिमेत अनेक सेलेब्रेटींची नावे समोर आली होती. या मोहिमेतच बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबूजी’ म्हणजेच अलोक नाथ यांच्यावर लेखिका-निर्मात्या विनता नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले होते. एवढेच नाही तर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता हेच आलोकनाथ #MeToo मोहिमेवरील चित्रपटात जजच्या भूमिकेत दिसणार आहे. खुद्द आलोक नाथ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बॉलिवूड मधील #MeToo मोहिमेवरील आधारित या चित्रपटाचे नाव ‘मै भी’ असे असून याचे दिग्दर्शन नासीर खान करणार आहे. आलोक नाथ यांच्याशिवाय या चित्रपटात खालिद सिद्दीकी, शावर अली, इम्रान खान, मुकेश खन्ना आणि शाहबाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

यासंदर्भात आलोक नाथ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. होय, मी या चित्रपटात आहे. तुम्हाला काही त्रास आहे का की मी या चित्रपटात दिसणार, याचे तुम्हाला दु:ख वाटतेय ? असा उलट सवाल त्यांनी केला. मी सध्या कुठल्याही चित्रपटात काम करत नाहीये. पण या चित्रपटाचे शूटींग आधीच पूर्ण झाले होते. एका गरिब निर्मात्यांच्या शब्दाखातर मी ही भूमिका स्वीकारली. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, असे ते म्हणाले.

या मोहिमेअंतर्गत अलोक नाथ यांच्यावर विनता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी आणि दीपिका अमीन यांनी गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपानंतर ‘द सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने त्यांना असोसिएशनमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

You might also like