आलोक वर्मा यांची सीबीआय प्रमुख पदावरून हकालपट्टी 

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – न्यायालयाने सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांची नियुक्ती  कायम ठेवली होती  मात्र सिलेक्ट समितीच्या आज झालेल्या बैठकीत सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२ डिसेंबर २०१६ ला राकेश अस्थानांची सीबीआयच्या अंतरिम संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ५ डिसेंबर २०१६ ला अॅडव्होकेट प्रशांत भूषण यांनी राकेश अस्थाना यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्यानंतर १ फेब्रुवारी २०१७ ला आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र २४ ऑगस्ट २०१८ ला आलोक वर्मा यांनी एका उद्योगपतीकडून २ कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांनी थेट केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र पाठवून केला होता. दरम्यान अस्थाना यांच्या या आरोपांची केंद्रीय दक्षता आयोगामार्फत चौकशी कर्मण्यत आली होती. दरम्यान सोमवारी सीबीआयने एक विशेष प्रसिद्धीपत्रक जारी करून आलोक वर्मांविरोधातले आरोप प्रतिमा मलीन करण्यासाठी करण्यात आल्याचे म्हंटले होते.

याचबरोबर सीवीसीने ११ सप्टेंबरला सीबीआयला तीन वेगळ्या नोटीस पाठवून संबंधित फाईल्स आणि कागदपत्रे मागितली होती. मात्र, वारंवार सूचना देऊनही सीबीआयच्या संचालकांनी ही कागदपत्रे आणि फाईल्स आयोगाला दिल्या नव्हत्या. आयोगाने विचारलेल्या प्रश्नांबाबत सीबीआय संचालकांकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नव्हते तसेच त्यांनी तपासात सहकार्य केले नाही किंबहूना आयोगाच्या कामकाजात अडथळे आणल्याचे आयोगाचे निरीक्षण होते.दरम्यान या परिस्थितीचा विचार करता केंद्रीय दक्षता आयोगाने आपल्या अधिकाराचा वापर करत सीबीआयचे संचालक आलोक कुमार वर्मा आणि विशेष संचालक राकेश आस्थाना यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर  सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सरकारच्या केंद्रीय दक्षता आयोगाने २४ ऑक्टोबर रोजी सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. त्यांच्या जागी एम. नागेश्वर राव यांना सीबीआयIचे अंतरिम संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली होती.

दरम्यान मंगळवारी सुप्रीम कोर्टाने केंद्रीय दक्षता आयोगाचा हा निर्णय अयोग्य ठरवत आलोक वर्मा यांना पुन्हा संचालकपदी नेमणूक केली  होती .दरम्यन न्यायालयाने सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांची नियुक्ती कायम ठेवली होती मात्र  सिलेक्ट समितीच्या आज झालेल्या बैठकीत सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे, आज  ( १० जानेवारी ) सीबीआयने  पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सह संचालक अजय भटनागर,  डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, सीबीआय मुख्यालयाच्या प्रशासन विभागाचे उप संचालक पदी अनिश प्रसाद हे कायम राहणार आहेत. तसेच विशेष युनिट क्र.1 च्या के. आर. चौरासिया हे प्रमुखपदी राहणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us