अल्पवयीन मुला-मुलीच्या प्रेम प्रकरणाचा भलताच प्रकार पाहून पोलीसही चक्रावले

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीतील चित्रपटांचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवरच प्रभाव असतो. परंतु अल्पवयीन कोवळ्या मुला-मुलींवर याचा गंभीर परिणाम होताना दिसतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चिमुरड्या मुलीने तिच्या प्रियकराला लिहिलेले भावनिक पत्र वाचून पोलीसदेखील चक्रावले आहेत. शुक्रवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकाराने ‘माय-बापांनो, मुली सांभाळा…’ अशी म्हणण्याची वेळ आल्याचं दिसत आहे.

नेमकी घटना काय ?

शुक्रवारी दुपारी मोठ्या उमरीतील पालकांंनी पोलिसात तक्रार दाखल केली की, एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या मुलीला त्रास देतो, शाळेजवळ जाऊन छेड काढतो. या तक्रारीनंतर याची दखल घेत पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला समजही दिली. यानंतर त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, मुलगीच आपल्याला रात्री-मध्यरात्री फोन करते. भेटायला बोलावते. प्रेमपत्र लिहिते. त्याच्या या खुलाशानंतर त्या मुलाने तिचे मेसेज आणि पत्र पोलिसांना दाखवले. त्यात जे काही समोर आले ते वाचून तर पोलीस चक्रावूनच गेले. तिने लिहिले होते की, पिल्लू…लव्ह यू…तू जेवण कर…नाहीतर मीसुद्धा जेवण करणार नाही….आपण पळून जाऊ, खोली करू… संसार थाटू. मुख्य म्हणजे असे एक नाही, तर अनेक भावनिक पत्रे लिहिली होती. इयत्ता आठवी-नववीत शिकणारी ती मुलगी असल्याचे समजत आहे.

पोलिसांनी यानंतर त्या अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनासुद्धा बोलावून घेतले. त्यांना सर्व प्रकार सांगत त्यांना समज दिली. त्यानंतर मुलावरही कारवाई करत त्याला सोडून दिले. याशिवाय पोलिसांनी संबंधित मुलीच्या आई-वडिलांचे, मुलीचे समुपदेशन करून मुलांवर लक्ष ठेवण्यास बजावले.

पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष

दरम्यान, पालकांनी मुलांबाबत थोडे दक्ष राहणे गरजेचे आहे. आपली मुले-मुली कोणाशी बोलतात कोणाशी नाही, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पालक मुलांकडे लक्ष देत नाहीत. मग नको नको ते प्रकार समोर येतात आणि त्यानंतर पालकांना जोराचा धक्का बसतो. परंतु तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. १३-१४ वर्षे वयाची मुलगी तिच्या प्रियकराला भावनिक पत्र लिहिते आणि त्यात पिल्लू तुला काय झालं. राग आला, तू बोलत का नाहीस. पिल्लू जेवला नाहीस…! असं म्हणते. तोपर्यंतही पालकांना काहीच कळू नये. यावरून पालक किती दुर्लक्ष करतात, हे दिसून येते.

शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुलांचा वावर

आपण अनेकदा पाहिले असेल की, शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुले उभी राहतात. त्यांचाही मुलींना जाच असतो. भीतीपोटी मुली हा प्रकार घरी सांगत नाहीत. अशी टपोरी मुले मुलींची छेड काढतात. काहीतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. आकर्षणामुळे काही मुलीसुद्धा भरकटत याची शिकारही होतात. शाळा-महाविद्यालयांनीसुद्धा वेळीच याकडे लक्ष देऊन पोलिसांत तक्रार करायला हवी. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणखी विचार केला जाणे गरजेचे आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like