झेनुआ कंपनीच्या यादीत राजनैतिक अधिकार्‍यांचाही समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या झेनुआ डाटा या कंपनीने तयार केलेल्या ओव्हरसीज की इन्फर्मेशन डाटाबेसमध्ये विद्वान, संशोधक, विचारगट आणि माध्यम संस्था यांच्यासह समाजावर प्रभाव टाकणारे किमान 200 लोक, तसेच महत्त्वाची राजनैतिक पदे भूषवलेले भारतीय विदेश सेवेचे 40 विद्यमान व सेवानिवृत्त अधिकारी यांची नावे समाविष्ट होती.

विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्यापासून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेले भारताचे इस्रायलमधील राजदूत संजीव सिंगला यांच्यापर्यंतचे अधिकार्‍यांवर या चिनी कंपनीने पाळत ठेवली होती. याशिवाय या कंपनीने हेरगिरी केलेल्या अधिकार्‍यांमध्ये संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. गुरुमूर्ती आणि संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त निरीक्षण पथकाचे सदस्य ए. गोपीनाथन यांचा समावेश आहे.

दरम्यान, या कंपनीचे व्यवहार बेकायदेशीर नसले, तरी फेसबुकने शेंझेन झेनुआ डाटा टेक्नॉलॉजीला व्यासपीठावर बंदी घातली आहे. या कंपनीने ज्या रीतीने सार्वजनिक माहितीसोबत छेडछाड केली आहे, ते आमच्या धोरणाच्या विरोधात आहे. सार्वजनिक माहितीही अशा रीतीने गोळा केली जायला नको. मात्र, या कंपनीवर केव्हा बंदी घातली किंवा तसे पत्र पाठवले याबद्दल फेसबुकच्या प्रवक्त्याने काही सांगितले नाही. त्यामुळे झेनुआ कंपनीच्या यादीत आणखी कोणाची नावे आहेत, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे .