सत्तास्थापनेच्या हालचालींना कमालीचा ‘स्पीड’, सर्व नेते दिल्लीहून मुंबईला रवाना

नवी दिल्ली वृत्तसंथा – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असं दिसतंय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची सर्व स्तरांवर बोलणी झाली असून पुढील बैठक मुंबईमध्ये होईल अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी दिली आहे. दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आहे तसेच या सर्व मुद्द्यांवर आमचे एकमत झाल्याचे देखील पृथ्वीराज चौहान यांनी सांगितले. तसेच उद्या मुंबईला गेल्यावर आमच्या मित्र पक्षांशी चर्चा होणार आहे आणि मग त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक मुंबईमध्ये पार पडेल असे मत पृथ्वीराज चौहान यांनी व्यक्त केले.

सत्तेचा फॉर्म्युला नेमका काय असेल कोणाला किती मंत्रिपद दिली जाणार याबाबत चौहान यांना विचारले असता त्यांनी लवकरच याबाबतची सर्व माहिती दिली जाईल असे सांगितले. झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे एकमत झाल्याने आता लवकरच राज्यात पर्यायी सरकार स्थापन होईल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. त्यासंबंधीच्या हालचालींसाठी दिल्लीत गेलेले सर्व नेते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे देखील चौहान यांनी सांगितले.

आघाडीसोबत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश आले तर तब्बल वीस वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात पुन्हा होईल. त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे.

Visit : Policenama.com