राजस्थानमध्ये ‘इथं’ आहे 11 लाख टन सोन्याचा साठा, देशाच्या एकूण सोन्यापेक्षा 5 पटीनं जास्त

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील थानाजी पोलीस स्टेशन भागात मुडियाबास हे ठिकाण आहे. सरिस्का व्याघ्र प्रकल्पापासून ६ किमी आणि जिल्हा मुख्यालय अलवरपासून ५० किमी अंतरावर मुडियाबास भूगर्भात सोन्या, चांदी आणि तांब्यासह इतर खनिजांचा साठा आहे. राजस्थानचे माजी मंत्री डॉ. रोहिताश शर्मा यांनी हा दावा केला आहे.

११ हजार मिलियन तांबे असल्याचा दावा
नुकतेच डॉ. रोहिताश शर्मा यांनी अलवर येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, मुडियाबासच्या आजूबाजूच्या २५ किलोमीटरच्या क्षेत्रात एक जागतिक दर्जाचा खनिज साठा आहे. येथे ११ हजार मिलियन टन तांबे बाहेर येऊ शकतो, त्यातील ५ ते १५ टक्के सोने आहे. हे सोने सुमारे ११ लाख टन आहे, जे देशाच्या एकूण सोन्याच्या साठ्यापेक्षा पाचपट जास्त आहे.

भाजप सरकारमध्ये वाहतूक मंत्री होते शर्मा
राजस्थानमधील भाजपाच्या भैरोसिंग शेखावत सरकारमध्ये डॉ. रोहिताश शर्मा वाहतूक मंत्री होते. त्यांनी मुडियाबासमधील खनिज साठ्यामागील भूगर्भीय सर्वेक्षण आकडेवारीच्या (जीएसआय) अहवालात हे सिद्ध केल्याचा दावा केला आहे. तसेच राज्य सरकारने कोणतीही ठोस पावले न उचलल्याबद्दल खंत व्यक्त केली.

जीएसआय अहवालाचा उल्लेख
शर्मा यांनी जीएसआयच्या वर्ष २०११-१२ च्या अहवालाचा हवाला देत म्हटले की, सर्वेक्षणात हे सिद्ध झाले होते कि मुडियाबास आणि आजूबाजूच्या जमिनीत इतके खनिज आहे की, राज्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल आणि सोबतच हजारो लोकांना येथे रोजगार मिळू शकेल.

अशोक गेहलोत सरकारवर निशाणा
शर्मा यांनी कोरोना महामारीनंतर येणाऱ्या आर्थिक संकटाबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ते राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, राजस्थान सरकार कोरोना संकटावेळी केंद्राकडून आर्थिक मदत न दिल्याचा आरोप करत आहे, जे चुकीचे आहे. जर राजस्थान सरकारने मुडियाबासच्या जमिनीत लपलेल्या या खनिज संपत्तीचा शोध घेतला, तर केंद्राच्या मदतीची गरज भासणार नाही.