‘मी टू’ नंतर आता ‘सेक्स स्ट्राइक’ चळवळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरामध्ये अनेक देशांमध्ये गर्भपातविषयक कायदे अत्यंत कडक केले आहेत. त्यामुळे अनेकवेळा महिलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यासाठी या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी सध्या जगभरात मोठ्याप्रमाणात होत आहे. ‘मी टू’चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री एलिसा मिलानो हिने महिलांसाठी एक नवीन चळवळ सुरु केली आहे. तिने महिलांना ‘सेक्स स्ट्राइक’ करण्याचे आव्हान केले आहे.

तिने ट्विटद्वारे महिलांना सांगितले की, गर्भपातविषयक कायदे बदलण्याच्या मागणीसाठी तिने महिलांना एकत्र येत ‘सेक्स स्ट्राइक’चा आवाहन केले आहे. महिलेचा तिच्या शरीरावर पूर्ण अधिकार असतो हे पटवून देण्यासाठी तिने ‘सेक्स स्ट्राइक’चा पर्याय सुचवला आहे. जोपर्यंत जगभरातील महिलांना त्यांच्या शरीरावर पूर्ण अधिकार प्राप्त होत नाही, तोपर्यंत महिलांनी आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबध ठेवू नयेत अर्थात ‘सेक्स स्ट्राइक’ करावा, असे तिने सांगितले.

पुढे एलिसा म्हणाली की, ‘आपल्या शरीरावर केवळ आपलाच अधिकार आहे, हे सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे. आम्ही आमच्या शरीरावर प्रेम करतो आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षदेखील करु शकतो. त्यामुळे सत्ताधारी पुरुषांना तुमच्यावर अधिकार गाजवू देऊ नका.’

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये नुकतेच गर्भपात कायद्यात काही बदल करण्यात आले. हार्टबील कायद्यानूसार, भ्रूणाच्या ह्रदयाचे ठोके एकू येऊ लागल्यानंतर महिला गर्भपात करु शकणार नाही असे ठरवण्यात आले. ६ आठवड्यात भ्रूणाच्या ह्रदयाचे ठोके ऐकू यायला लागतात. मात्र, अनेक वेळा ६ आठवडे झाल्यानंतरही महिला गरोदर असल्याचे तिच्या लक्षात येत नाही त्यामुळे हा कायदा महिलांसाठी जाचक असून त्यात बदल करावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.