‘मी कोरोना Positive की Negative ?’, तरुणाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आपला कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे की, निगेटीव्ह असा प्रश्न पडल्यानंतर एका तरुणानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र पाठवलं आहे. या तरुणाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट महापालिकेनं केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटीव्ह दिला होता. परंतु जिल्हा रुग्णालयात टेस्ट केल्यानंतर मात्र त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. म्हणून आता हा तरुण गोंधळात पडला आहे. यावरून कोरोना चाचणीत घोळ असल्याचं दिसून येत आहे.

24 वर्षीय तरुणानं मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे की, “अहमदनगर शहर महानगरपालिकेकडून जी कोविड 19 अँटीजन (रॅपिड टेस्ट) तपासणी केली जाते. ही तपासणी खरंच कोविड सारख्या गंभीर महामारीचं निदान करते का ? याबद्दल शंका आहे. मी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा प्रशासन, अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्या वतीनं आयोजित कोविड 19 अँटीजन तपासणी उपक्रमांतर्गत जुने नगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणी केली. तपासणीनंतर 10 मिनिटांतच मला कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आलं.”

पुढे बोलताना तरुण लिहितो की, “मी खूप घाबरलो आणि टेंशनमध्ये आलो. परंतु मला चाचणीची शंका आली. कारण तिथं प्रत्येक व्यक्तीला पॉझिटीव्ह सांगितलं जात होतं. मी माझ्या मित्रासोबत चर्चा केल्यानंतर त्यानं मला सिव्हील हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्याचा सल्ला दिला. विलंब न करता मी सिव्हील हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथं स्वॅब दिला. 2 दिवसांनी 23 ऑगस्टला सिव्हील हॉस्पिटलचा रिपोर्ट आलात्यात मी निगेटीव्ह असल्याचं सांगण्यात आलं होतं. 24 ऑगस्ट रोजी मी पुन्हा एकदा रॅपिड टेस्ट केली. ती पुन्हा पॉझिटीव्ह आली होती. म्हणून आता मी कोरोना पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह असा प्रश्न मला पडला आहे.”

तरुण लिहितो की, “रॅपिडे टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर मी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गेलो तर तेथील डॉक्टर मला म्हणाले की, तुम्ही निगेटीव्ह आहात. तुम्हाला उपचारांची गरज नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनीही वेगळाच सल्ला दिला. तुम्ही एचआरसीटी करा. हे रिपोर्ट आम्ही ग्राह्य धरत नाही. एचआरसीटी केल्यावर तुम्हाला नेमका काय त्रास होत आहे हे कळेल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे एचआरसीटीमध्ये निमोनियाची लक्षणं कळून येतात.”

तरुणानं असंही लिहिलं आहे की, “कोरोना टेस्टच्या नावावर जनतेची लूट सुरू आहे. त्यामुळं आपण स्वत: यामध्ये लक्ष घालून सदर प्रकरणात योग्य ती कारवाई करावी व रॅपिड टेस्ट बंद करावी. मी स्वत: आता गोंधळून गेलो आहे की, मी पॉझिटीव्ह आहे की, निगेटीव्ह आहे ? या सर्व पॉझिटीव्ह निगेटीव्ह रिपोर्टमध्ये जर माझं काही बरं वाईट झालं तर सर्व जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असेल असंही या तरुणानं पत्रात म्हटलं आहे.