अमळनेर मारहाण प्रकरण : उदय वाघ यांच्याविरुद्ध दंगलीचा तर बी. एस. पाटलांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे माजी भाजप आमदार डॉ. बी. एस. पाटील मारहाण प्रकरणात अखेर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच प्रकरणात डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय वाघ यांच्यावतीने अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीने तक्रार दिली होती. या फिर्यादीवरून पाटील यांच्याविरोधात रात्री उशिरा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर उदय वाघ तसेच पाटील समर्थ पोलीस ठाण्यासमोर हजर झाले होते. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वादाचे नक्की कारण काय आहे ?

तिकीट वाटपावरून हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाचे खासदार बी.एस. पाटील यांना तिकीट मिळाले नाही, तेव्हा पारोळा शहरात त्यांनी एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात टीका केली होती. यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी, तसेच भाजपाच्या विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना भाजपाचे देण्यात आलेले तिकीट नाकारण्यात आले. यावरून हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?

अमळनेरमध्ये बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुरुवातीला उदय वाघ आणि बी. एस. पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. मंचावरच दोन्ही नेते भिडले. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बी. एस. पाटील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. उदय वाघ यांच्या समर्थकांनी यावेळी स्मिता वाघ आगे बढो, अशी घोषणाबाजीही केली.

हा गोंधळ पाहता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वत:चे प्राण धोक्यात घालत माजी आमदार पाटील यांचा जीव वाचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना व्यसपीठावरुन खाली ढकलले. यावेळी त्यांनी अन्य कार्य़कर्त्यांनाही दूर केले. या हाणामारीत महाजन यांनी तत्परता दाखविली नसती तर मेळाव्यातच अघटित घडण्याची शक्यता होती.