पेट्रोलपंप मालकाची गोळ्या झाडून हत्या

अमळनेर : पोलीसनामा आॅनलाईन
अमळनेर मधील बोहरी पेट्रोलपंपाचे मालक असगरअली बोहरी उर्फ बाबा बोहरी यांची गुरूवारी रात्री बाराच्या दरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना बाबा बोहरी हे रात्री पंपावरून घरी जात असताना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली असून मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. ही घटना पुर्ववैमनस्यातून घडली की, आरोपी लुटीसाठीच आले होते, याची चौकशी सुरू आहे. दोन महिन्यात खूनाच्या दोन घटना घडल्यामुळे शहरात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाबा बोहरी यांचा पेट्रोल पंप न्यू प्लॉट भागात शिवाजी गार्डन जवळ आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ते पंपावर हिशोब घेण्यासाठी आले होते. हिशोब केल्यानंतर ते घराकडे निघाले असताना काही अंतरावर उद्यानाजवळ दबा धरून बसलेल्या चार ते पाच मारेकर्‍यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी बोहरी यांच्या छातीच्या डाव्या बरगडीत शिरली. अशा अवस्थेत देखील त्यांनी दुचाकी चालवून पेट्रोल पंपावर आणली. पंपावरील कर्मचार्‍यांना त्यांनी आपल्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिली.

कर्माचाऱ्यांनी त्यांना तात्काळ धुळे रस्त्यावरील डॉ. निखील बहुगुणे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली असून अधिक तपासासाठी जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला बोलावले आहे.