विखे पाटील भाजपातले ‘बाटगे’ तर राणे ‘पावटे’, शिवसेनेचा टोला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थिर असून फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट पडला आहे. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय असे म्हणत शिवसेनेेने भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण पाटील यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावर विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविरुद्ध ही टीका केल्यानंतर सामानातून विखेना उत्तर दिले आहे. ’जगभरातील विनोदी साहित्यात विसराळूपणा हे विनोदाचे अंग बनले आहे. मराठी रंगमंच आणि पडद्यावरही ‘विसराळू’ पात्र खास आणून विनोद निर्माण केला जातो. अशा विसराळू पात्रांत आता नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटलांची भर पडली आहे. ते विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहेत याचे प्रयोग ते स्वतः अधूनमधून करीत असतात.

विखे महाशयांनी दोनेक दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबाबत असे महान भाष्य केले की, “एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत.” यावर शांत बसतील ते थोरात कसले! थोरातांनीही सांगितले की, “मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे!” यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणार्यांनी दुसर्यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे’ असा सणसणीत टोला सेनेने विखे पाटलांना लगावला. ’विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला.

वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे. आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात’ अशी टीका विखेंवर करण्यात आली.