‘अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा आज पराभव केला.’ काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला असून, महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा आज पराभव केला,” असा सणसणीत टोला सावंत यांनी लगावला आहे.

ट्विटर वर एक व्हिडिओ ट्विट करत सावंत म्हणाले, “भारतीय जनता पक्ष सातत्याने महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनीचे सरकार संबोधित असे. अमर, अकबर, अँथनी जरा हिट चित्रपट होता. तसेच महाविकास आघाडीचे कॉम्बिनेशन आता हिट झाले आणि अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा पराभव केला एवढे मात्र निश्चित आहे.”

विधान परिषदेच्या निकालावर बोलताना सावंत यांनी म्हटलं, “भाजपच्या स्वरूपात लोकशाही समोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आले. देशहितासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे होते. त्यातूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले गेले असून, आजचा निकाल हा या तीन पक्षांच्या एकोप्याचे फळ आहे. भाजपचे १०५ आमदार कामी आले नाहीत. एक जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे. मस्तवालपणात वागणाऱ्या भाजपसाठी ही मोठी चपराक असून, दोन दिवसांपूर्वीच १०५ च्या १५० जागा होतील अशी वलग्ना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे,” असा चिमटाही सावंत यांनी काढला.