शाळेत खिचडी बनवणाऱ्या ‘बबिता ताडे’ KBC 11 च्या दुसऱ्या कोट्याधीश ! जाणून घ्या दीड हजार ते एक कोटीपर्यंतचा प्रवास (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ प्रचंड चर्चेत आहे. चर्चेचे कारण आहे KBC 11 च्या दुसऱ्या कोट्याधीश विजेत्या बबिताताई ! शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवणाऱ्या आणि केवळ दीड हजार रुपये महिना एवढा पगार घेणाऱ्या बबिता सुभाष ताडे यांनी मिळवलेले यश शब्दात व्यक्त न करण्याजोगे आहे. जाणून घेऊयात या करोडपती विजेत्या सर्वसामान्य स्त्रीच्या विजेतेपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल –

खडतर कौटुंबिक पार्श्वभूमी :
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी हे बबिता यांचं गाव. त्यांचे पती सुभाष ताडे स्थानिक पंचफुलाबाई हरणे विद्यालयात शिपाई म्हणून काम करतात. मागील २३ वर्षापासून हे जोडपे येथेच राहते. बबिता ताडे यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी पुण्याला तर मुलगा अंजनगाव इथेच शिक्षण घेत आहे. बबिता या पदवीधर असून पदव्युत्तरचे एक वर्षाचंही शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. त्यानंतर काही काळ त्यांनी स्पर्धा परीक्षाही दिल्या, मात्र कौटुंबिक जबाबदारी आणि अभ्यास एकाच वेळी सांभाळणे शक्य नव्हते. संसाराला हातभार लावण्यासाठी बबिताताई सुद्धा पती काम करत असलेल्या शाळेत खिचडी शिजवण्याचं काम करतात.

करोडपतीपर्यंतचा प्रवास :
अगोदरपासूनच वाचनाची आवड असल्याने बबिताई यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्न केला. KBC च्या अकराव्या सीझनमध्ये सुरुवातीला ३२ लाख इच्छुक आले होते. त्यानंतर चाळणी पद्धतीने यात घट होऊन ४ हजार ८०० स्पर्धक पात्र ठरले. नंतर अंतिम ऑडिशनसाठी २१०० स्पर्धक पात्र ठरले होते. यामधुनही आपले कौशल्य दाखवत बबिताताई KBC च्या हॉट सीटवर आल्या. त्यानंतर त्यांचा वाचनाचा छंद, शिक्षणाप्रतीची आस आणि ध्यास, त्यांची मेहनत यांचा खुबीने वापर करून त्यांनी विजेतेपदाचा गवसणी घातली आणि त्या करोडपती झाल्या.

दरम्यान आज सोनी टीव्हीच्या ट्विटर पेजवर अमिताभ बच्चन आणि बबिताताईंची एक कोटी रुपये जिंकल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली सर्वत्र पसरली. तोपर्यंत शहरातील कोणालाही याची कल्पना नव्हती. बबिताताईंनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. मात्र या व्हिडिओनंतर मात्र त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

बबिताताई करोडपती बनलेला KBC 11 चा एपिसोड १८ आणि १९ सप्टेंबर रोजी प्रसारित होणार आहे. बबिताताईंना यासंदर्भात विचारले असता त्यांनी त्यांचा वाचनाचा छंद त्यांना करोडपतीपर्यंत घेऊन आला आहे असे सांगितले.

Visit – policenama.com