Amazon कडून भारतात होणार मोठी नोकरभरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अ‍ॅमेझाॅनमध्ये तब्बल १३०० च्या आसपास जागा असून, त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. विशेष म्हणजे भारतात ही भरती करण्यात येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. भरतीसाठी करण्यात आलेल्या या जागांमध्ये भारतानंतर चीनचा क्रमांक लागतो. परंतु आनंदाची बाब अशी की, चीनच्या तिप्पट कर्मचारी भारतामध्ये घेण्यात येणार आहेत. अ‍ॅमेझाॅनचे मुख्यालय हे अमेरिकेत आहे.
अशी माहिती समोर आली आहे की, अ‍ॅमेझाॅनकडून  ई-कॉमर्स आणि क्लाऊड बिझनेस या दोन्हींचा विस्तार करण्यात येतो आहे. याच पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात येणार आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये लवकरच १२८६ जागा भरण्यात येणार आहेत. त्यानंतर चीनमध्ये ४६७, जपानमध्ये ३८१, ऑस्ट्रेलियामध्ये २५० तर सिंगापूरमध्ये १७४ जागा भरण्यात येणार आहेत. पेमेंट, काँटेंट, व्हाईस असिस्टंट, फूड रिटेल आणि ग्राहक सेवा या क्षेत्रामध्ये कंपनीकडून विस्तार करण्यात येणार आहे. गतवर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीने ६० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. सध्या अ‍ॅमेझॉनकडे ६.१ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
असेही समजत आहे की, अ‍ॅमेझाॅन भारतात फूड रिटेलिंग प्रॉडक्टसवर ५०० डॉलरची गुंतवणूक करणार आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट ऍण्ड मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, मशीन लर्निंग, क्लालिटी चेक, काँटेट डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स, स्टुडिओ ऍण्ड फोटोग्राफी या विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे.
ग्राहकांसाठी एक आनंदाची बाब अशी की, येत्या २० ते २३ जानेवारी दरम्यान अ‍ॅमेझाॅनकडून ग्रेट इंडियन सेलचे आयोजन करण्यात आले आहे. लॅपटॉप आणि मोबाईलवरही या काळात ग्राहकांना मोठी सूट दिली जाणार आहे. इतकेच नाही तर, एचडीएफसीच्या कार्ड्सवर १० टक्के तात्काळ डिस्काऊंट दिला जाणार आहे.