मनसेच्या ‘या’ मागणीला Amazon चा प्रतिसाद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    सध्या सणांच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टनं मोठ्या सेलचं आयोजन केलं आहे. इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह हे अ‍ॅप भारतात काम करतं. परंतु या अ‍ॅपसाठी मराठी भाषेचा वापर केला जाताना दिसत नाही. त्यामुळं आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी येत्या 7 दिवसात त्यांचं अ‍ॅप मराठी भाषेत सुरू करावं अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलनं होईल असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. मनसेच्या या भूमिकेची अ‍ॅमेझॉननं दखल घेतली आहे.

अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई मेल पाठवला होता. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या वतीनं अ‍ॅमेझॉन.इन च्या जनसंपर्क विभागानं त्याला प्रतिसाद दिला आहे. बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं आहे. लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल असं अ‍ॅमेझॉननं स्पष्ट केलं आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अखिल चित्रे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, अ‍ॅमेझॉनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची दखल अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत… राजसाहेब म्हणतात तसं… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं.”

अ‍ॅप मराठी भाषेत कार्यरत नसल्यां मनसेची नाराजी

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी येत्या 7 दिवसात त्यांचं अ‍ॅप मराठी भाषेत सुरू करावं अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलनं होईल असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. “अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट या बँगळुरू स्थित कंपन्यांची दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावललं आहे. तरी आज @Flipkart @amazonIN या कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन @mnsadhikrut दणका दिला.” असं ट्विट चित्रे यांनी केलं होतं.