‘राफेल’च्या स्वागतासाठी अंबाला एयरबेस सज्ज, 3 KM पर्यंत उडू शकणार नाहीत ‘ड्रोन’

नवी दिल्ली : फ्रान्सकडून 7 हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतात पोहचत असलेली 5 राफेल फायटर जेट, 29 जुलैला भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात सहभागी होतील. ही फायटर जेट अंबाला एयरबेसवर ठेवण्याची तयारी आहे. राफेलच्या स्वागतासाठी आतापासूनच अंबाला एयरबेसवर तयारी केली जात आहे. राफेल भारतात येण्यापूर्वी अंबाला एयरबेसची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. तर अंबाला एयरबेसच्या 3 किलोमीटरच्या परिसरात नो ड्रोन झोन घोषित केला आहे.

राफेल भारतात आणण्याची तयारी जोरदार सुरू आहे. अंबाला एयरबेसवर राफेल पोहचण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था आणखी चांगली केली जात आहे. एयरबेसच्या तीन किलोमीटरच्या परिघात ड्रोनवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर कुणी याचे उल्लंघन केले तर त्यावर कारवाई होणार आहे.

अंबाला कॅम्पचे डीएसपी राम कुमार यांनी सांगितले की, राफेल अंबाला एयरबेसमध्ये तैनात होणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आतापासून राफेलच्या सुरक्षेसाठी अनेक नियम तयार केले आहेत. जर कुणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

राफेल अंबालामध्ये तैनात करण्यामागे सर्वात मोठे कारण हे आहे की, चीनच्या सीमेपासून अंबाला एयरबेस केवळ 300 किलोमीटरवर आहे. 2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या 36 राफेल फायटर जेटच्या करारानंतर 5 राफेल आता बुधवारी भारतात दाखल होत आहेत.

5 पैकी दोन ट्रेनर एयरक्राफ्ट, 3 लढाऊ विमाने
भारतीय दूतावासाच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटले आहे की, 10 एयरक्राफ्ट ठरलेल्या वेळेनुसार तयार आहेत, ज्यापैकी 5 एयरक्रफ्ट ट्रेनिंगसाठी फ्रान्समध्ये ठेवण्यात आली आहे, तर 5 राफेल भारतात पाठवण्यात येत आहेत. भारतीय हवाई दलाच्या पुढील बॅचचे पायलट, ग्राऊंड स्टाफ यांचे मेंटनन्सचे ट्रेनिंगसुद्धा फ्रान्समध्ये होईल, जे नऊ महिने चालेल. भारतात येत असलेल्या या 5 विमानांमध्ये दोन ट्रेनर एयरक्राफ्ट आहेत आणि तीन लढाऊ विमाने आहेत. 2021च्या अखेरीस 36 राफेलची डिलिव्हरी पूर्ण होईल.