17 फेब्रुवारीला 10 मिनिटांसाठी सचिन वाझे अन् मनसुख हिरेन भेटले होते, CCTV त कैद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा तपासात एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. त्यातील एक कार रत्नागिरीमधील शिवसेना नेता विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर असल्याचे समोर आले आहे तर दुसरं वाहन मर्सिडीज बेन्झ आहे. एका इंग्रजी दैनिकाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, एनआयए आणि एटीएसने संयुक्तरित्या केल्या सीसीटीव्ही तपासणीत १७ फेब्रुवारीला फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत हिरेन आणि वाझे यांच्यात १० मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

वाझेंकडून वापरण्यात येत असलेली मर्सिडीज तीन दिवसांपूर्वी पोलिसांकडून जप्त करण्यात आली. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा ताबा मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसकडे आहे. शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात एटीएसकडून वाझेंची कोठडी मागितली जाऊ शकते.

सीसीटीव्ही तपासणीत १७ फेब्रुवारीला फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत हिरेन आणि वाझे यांच्यात १० मिनिटं चर्चा झाल्याचं एनआयए आणि एटीएसला निदर्शनास आल. ओला कॅबने हिरेन दक्षिण मुंबईत गेले होते. मुलूंड -ऐरोली रोडला आपली स्कॉर्पिओ बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता.

मुंबई पोलीस मुख्यालयातील आपल्या कार्यालयातून मर्सिडीजमधून सचिन वाझे बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. यानंतर सीएसएमटीबाहेर सिग्लजवळ त्यांचं वाहन उभं असल्याचं दिसलं आहे. सिग्नल सुरु झाला मात्र मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. दरम्यानच्या काळात रस्ता ओलांडून येऊन मनसुख हिरेन मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर जीपीओच्या समोर मर्सिडीज उभी असल्याचं दिसत आहे. जवळपास १० मिनिटं गाडी तिथेच होती. यानंतर गाडीतून हिरेन बाहेर पडतात आणि गाडी पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.

सीएसएमटीला ज्या ओला कॅबने मनसुख हिरेन यांनी प्रवास केला त्याच्या चालकाने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार हिरेन यांना , प्रवासादरम्यान पाच वेळा फोन आला. हा फोन वाझे यांनी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस मुख्यालयासमोर रुपम शोरुमजवळ हिरेन यांना भेटण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शेवटच्या फोनला जागा बदलून सीएसएमटी करण्यात आली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.