..तर मी राजकारण सोडून देईन : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी मुंबई यथे महासभा घेण्यात आली. या महासभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम चे नेते ओवेसी यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची काँग्रेसने हमी दिली तर त्यांच्याशी युती करण्याची आमची तयारी आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. आता राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर याना ‘हम तुम्हारे साथ है’ ची री ओढली आहे. “प्रकाश आंबेडकरजी, आरएसएसला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे याचा मसुदा आपण द्या, महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. यासंदर्भाचे ट्विट त्यांनी केले आहे.

काय आहे ट्विट

जितेंद्र आव्हाड यांनी आज (ता.24) ट्विट करून म्हटले आहे की, प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत कसे आणता येईल याचा मसुदा समोर ठेवावा. त्या मसुद्यावर आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या घेण्याची जबाबदारी माझी असेल आणि तुम्ही दिलेल्या मसुद्यावर जर सह्या झाल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईन पण आघाडीत बिघाडी करू नका, असे स्पष्ट मत आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन पाहून त्याचा लोकसभेच्या किती जागावर निवडून येण्यासाठी फायदा होईल याबाबत शंका आहे, पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नक्की तोटा होऊन वंचित बहुजन आघाडीचा फायदा हा भाजप युतीला होईल अशी शक्यता आहे. या कारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत बिघाडी करू नका असे आवाहन केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे.

… तर काँग्रेससोबत आंबेडकरांची युतीची तयारी

वंचित बहुजन आघाडीची सभा शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर घेण्यात आली होती. या झालेल्या विराट सभेत लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुुंकले. आंबेडकरांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. काँग्रेसने जुन्या काँग्रेसप्रमाणे धर्मनिरपेक्षतेची भूमिका घ्यावी. आणि केंद्रात सत्तेवर आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची काँग्रेसने हमी दिली तर त्यांच्याशी युती करण्याची आमची तयारी आहे. असे आंबेडकर म्हणाले.