अंबरनाथ : 4 वर्षाच्या चिमुकल्याने सोडले क्षणात प्राण

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – माणसाला मरण कधी, कोठे आणि कसे येईल हे सांगता येत नाही. अशीच एक दुर्दैवी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथमध्ये 4 वर्षाचा चिमुकला आपल्या मित्रांसोबत खेळत असताना जेसीबी चालकाने टाकलेला ग्रीडचा ढिगारा मुलाच्या अंगावर पडला. यामध्ये गुदमरुन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलाउद्दीन शेख असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून हा प्रकार शनिवारी (दि.6) सायंकाळी अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा खडी मशीन भागात घडला.

मिळाळेल्या माहितीनुसार, बुवापाडा परिसरात असलेल्या खडी मशीन भागात काम सुरू असताना जेसीबी चालकाने ग्रीडचा ढिगारा टाकला. त्यावेळी मयत सलाउद्दीन शेख हा आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी खेळत होता. ढिगारा एवढा मोठा होता की ढिगाऱ्याखालून बाहेर पडणे सलाउद्दीनला शक्य झाले नाही. त्यामुळे त्याचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार त्याच्या मित्राने पाहिला मात्र, तो घाबरल्याने याबाबत कोणालाच काही सांगितले नाही. त्याने वेळेवरच सांगितले असते तर कदाचित सल्लाउद्दीन याचे प्राण वाचले असते.

सल्लाउद्दीन शेख याच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहेत. जेसीबी चालकाने रेती (ग्रीड) टाकताना लक्ष का दिले नाही. चालकाने जर थोडे लक्ष दिले असते तर मुलाचे प्राण वाचले असते. जेसीबी चालकाचा निष्काळजीपणा आणि खडी मशीन भागात सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत नसल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खडी मशीन मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सल्लाउद्दीन हा शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नसल्याने अंबरनाथ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सकाळी त्याचा शोध घेत असताना रेतीचा ढिगारा बाजूला करण्यात आला. त्यावेळी ढिगाऱ्यात मुलगा आढळला. या घटनेमुळे सलाउद्दीन रहात असलेल्या बुवापाडा परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सलाउद्दीन शेख याच्या नातेवाईकांनी खडी मालकाकडे मुलाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. तर खडी मशीनचा प्रोजेक्ट असलेली जागा ही वन विभागाची असून रीतसर या जागेवर परवानगी घेऊन प्रोजेक्ट उभारला आहे. कोणी आत येऊ नये म्हणून संरक्षक भिंत देखील उभारली होती. मात्र, ती इथल्या लोकांनी पाडल्याचा दावा खडी मशीन मालक विपुल सावळा यांनी केला आहे.