प्रेम प्रकरणातून तरुणाने थेट रुग्णवाहिकाच पेटवली

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमप्रकरणातून वर्ध्यामध्ये रुग्णवाहिका जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चालकाला मारहाण करत आरोपीने थेट रुग्णवाहिकाच जाळून टाकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी रुग्णवाहिका चालक हा रुग्ण आणण्यासाठी जात होता. यावेळी संघर्ष लोखंडे हा तीन युवकांसह रुग्णवाहिकेचा मालक तन्मय मेश्रामच्या शोधात आला. यानंतरसंघर्ष लोखंडे आणि त्याचे सहकारी रुग्णवाहिकेमध्ये चढले आणि तन्मय मेश्रामबाबत विचारू लागले. त्यावेळी तन्मय मेश्रामबाबत माहिती न मिळाल्याने संघर्ष आणि त्याच्या सहकार्‍यांनी रुग्णवाहिका चालक कुंदन कोकाटेवर हल्ला केला. त्यानंतर कुंदनने गाडीतून उडी घेतली आणि पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. या कालावधीत संघर्ष लोखंडेने साटोडा शिवारात नेलेली रुग्णवाहिका पेटवून दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा अशा प्रकार घडल्यामुळे तरुणांमध्ये पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.