चिनी विस्तारवादाला अमेरिकेची ‘चपराक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणावर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने गलवान खोर्‍यातील चीनच्या हिंसक घुसखोरीचा एकमताने निषेध केला. या मुद्दयाशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकृतता कायद्यातील (एनडीएए) दुरुस्ती अमेरिकी प्रतिनिधिगृहाने मंजूर केली असून, दक्षिण चीन सागरातील वाढत चाललेल्या वर्चस्वाविरोधातही चिंता व्यक्त केली.

‘एनडीएए’ सुधारणा तरतूद ही काँग्रेसचे सदस्य स्टीव्ह शॅबट यांनी भारतीय वंशाचे सदस्य आमी बेरा यांच्यासमवेत मांडली होती. ती एकमताने संमत झाली आहे. भारत आणि चीन यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव चर्चेच्या मार्गाने कमी करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रतिनिधिगृहात या कायद्यातील अनेक सुधारणा तरतुदी मान्य करण्यात आल्या आहेत. भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, दक्षिण चीन सागर, जपानमधील सेन्काकू बेटे या भागात चीन मिळवू पाहत असलेले वर्चस्व हा चिंतेचा विषय आहे, यावर एकमत झाले. अमेरिकी काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनीही यावेळी चीनच्या धोरणांचा निषेध केला.

दक्षिण चिनी समुद्राच्या जलाशयावर, त्यातून जाणार्‍या जलमार्गावर आणि तेथील सागरी-खनिज संपत्तीवर चीन दावा करीत असल्याबद्दल या कायद्यात टीका करण्यात आली. ब्रुनेई, मलेशिया, फिलीपाईन्स, तैवान आणि व्हिएतनाम या देशांकडून दावा होत असलेल्या क्षेत्रात चीन लष्करी तळ उभारत असल्याचा निषेध करण्यात आला. चीनचा हा विस्तारवादी आणि आक्रमक पवित्रा घातक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारत – चीन सीमेवर गलवान खोर्‍यात चीनने हिंसाचार केला. चीनकडून प्रादेशिक दादागिरी वाढत चालली आहे. चीनने करोना साथीचा गैरफायदा घेऊन भारताचा प्रदेश गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला असून दक्षिण चीन सागरातही सेन्काकू बेटे बळकावण्याचा प्रयत्न चालवला आहे. चीनच्या वाढत्या प्रादेशिक विस्तारवादाची आम्हाला चिंता वाटते, असे ‘एनडीएए’ सुधारणा तरतुदीत मांडण्यात आले.