Coronavirus : कोरोनाचा हाहाकार ! जगातील 30 कोटी मुलं शाळेपासून ‘दूर’, कर्बलामध्ये शुक्रवारची नमाज ‘रद्द’, कॅलिफोर्नियामध्ये ‘आणीबाणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे जगभरातील जवळपास ३० कोटी मुलांना घरी बसवण्यात आले आहे. कारण या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनसह अनेक देशांत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, इटलीमधील सर्व शाळा गुरुवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. चीनमधून पसरलेला हा विषाणू आता जवळपास ८० देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात ९५ हजाराहून अधिक लोक संक्रमित झाले असून ३२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युनेस्कोने बुधवारी सांगितले की कोरोना संसर्गाच्या भीतीने १३ देशांमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

कर्बला मध्ये जुम्माच्या दिवशी नमाज रद्द
कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या भीतीने इराकच्या कर्बला शहरातील जुम्माच्या दिवशी नमाज रद्द करण्यात आला आहे. इराकच्या शेजारच्या देशात इराणमध्ये या विषाणूमुळे आतापर्यंत १०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३,५१५ घटनांची पुष्टी झाली आहे. इराणमधील सर्व शाळा आणि विद्यापीठे यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत.

या देशांत परिस्थिती धोकादायक
इटलीमध्ये देखील कोरोना विषाणूमुळे १०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १५ मार्च पर्यंत शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या युरोपीय देशात संक्रमण झालेल्या लोकांची संख्या ३००० च्या पुढे गेली आहे. आशियाई देश दक्षिण कोरियामधील शाळादेखील २३ मार्चपर्यंत बंद आहेत. या देशात सुमारे ६००० लोक संक्रमित झाले आहेत. मार्च अखेर जपानमधील जवळपास सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जपानमध्ये संक्रमित लोकांची संख्या १००० च्या पार पोहोचली आहे. फ्रान्समध्ये बाधित भागातील जवळपास १२० शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

कॅलिफोर्निया मध्ये आपत्कालीन परिस्थिती
अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ११ बळी गेले आहेत. अमेरिकेच्या खासदारांनी या विषाणूचा सामना करण्यासाठी ८.३ अब्ज डॉलर्स (सुमारे ६० हजार कोटी रुपये) देण्याचे मान्य केले आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूजम यांनी प्रांतात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. या अमेरिकन प्रांतात ५३ प्रकरणे नोंदली गेली आहेत. तसेच हाँगकाँगमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचे संक्रमण झालेल्या एका व्यक्तीमुळे पाळीव कुत्र्यात विषाणूच्या संसर्गाची पुष्टी केली आहे. माणसापासून प्राण्यापर्यंत कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची ही पहिली घटना आहे. हाँगकाँगमध्ये संक्रमित लोकांची संख्या १०० पेक्षा अधिक झाली आहे.

स्वित्झर्लंडमध्ये पहिला मृत्यू तर चीनमध्ये ३ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
स्वित्झर्लंडमध्ये कोरोना विषाणूने ग्रस्त असलेल्या ७४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या मध्य युरोपीय देशात कोरोनापासून झालेला हा पहिला मृत्यू आहे. स्वित्झर्लंडमध्ये ५८ लोकांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. हा विषाणू रोखण्याच्या प्रयत्नात जगभरातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, चीनमधील कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. संक्रमित लोकांची संख्या ही ८०,४०० इतकी झाली आहे.