Coronavirus : ‘कोरोना’वर ‘मलेरिया’ची औषधे ‘प्रभावी’, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, अमेरिकेच्या ‘अन्न-औषध प्रशासना’ने दिली उपचारास परवानगी

वॉशिग्टन : वृत्त संस्था – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. मलेरियाच्या औषधाचा वापर करुन कोरोना विषाणूवर उपचार करण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,कोरोना विषाणूवर उपचारासाठी मलेरियाच्या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन असे या औषधाचे नाव आहे. या औषधाने कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. तसे परीक्षण करण्यात आले असून परिणाम सकारात्मक आहेत.

जगभरात २ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात जवळपास ९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यु झाला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे. आतापर्यंत १८६ जणांना देशात कोरोनाची लागण झाली असून चार जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांवर मलेरियावरील औषधाचा वापर झाल्यास त्यातून रुग्ण लवकर बरे होऊन आपापल्या घरी जाऊ शकतील. यावर भारतातील आरोग्य विभागाकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.