‘कोरोना’बाधित रूग्णात प्रथमच 2 नवीन ‘फुफ्फुसांचं प्रत्यारोपण’, भारतीय डॉक्टरांनी अमेरिकेत रचला ‘इतिहास’, जाणून घ्या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मेरठमधील एका डॉक्टरने अमेरिकेत आपल्या यशाने देशाचे नाव मोठे केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या नेतृत्वात एका कोरोना रूग्णाचे अतिशय गुंतागुंतीचे ऑपरेशन केले आणि त्यात दोन नवीन फुफ्फुसांचे प्रत्यारोपण (Transplant) केले. हे ऑपरेशन इतके गुंतागुंतीचे होते की ते पूर्ण करण्यास तब्बल 10 तास लागले. कोरोना रूग्णात असे ऑपरेशन प्रथमच झाले आहे. अमेरिकेत हे गुंतागुंतीचे ऑपरेशन मेरठमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या डॉ. अंकित भरत यांच्या नेतृत्वात करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या पथकाने अमेरिकेत कोरोना संसर्गाने पीडित असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीच्या फुफ्फुसांचे प्रत्यारोपण केले.

ऑपरेशन झाले नसते तर तरुणीचा मृत्यू होता निश्चित

एका न्यूज एजन्सीने शिकागोमधील नॉर्थ-वेस्टर्न मेमोरियल हॉस्पिटलचा हवाला देत अशी माहिती दिली आहे की ज्या तरुणीचे फुफ्फुसांचे प्रत्यारोपण झाले आहे तिच्यावर ऑपरेशन केले नसते तर तिचा मृत्यू निश्चित होता. या अत्यंत गुंतागुंतीच्या ऑपरेशननंतर तरुणीला सध्या डॉक्टरांच्या अतिदक्षतेखाली आयसीयूमध्ये ठेवले गेले आहे. तिच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

संपूर्ण फुफ्फुसात पसरला होता कोरोना

रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार ज्या कोरोनाबाधित तरुणीला दोन नवीन फुफ्फुसे लावण्यात आले आहेत, ती गेल्या दोन महिन्यांपासून कृत्रिम फुफ्फुसांवर अवलंबून होती. 10 तास चाललेल्या या ऑपरेशनची प्रक्रिया खूपच क्लिष्ट होती. कोरोनाचा संसर्ग त्या तरुणीच्या संपूर्ण फुफ्फुसात पसरला होता. अनुभवी थोरॅसिस सर्जरी आणि मेरठ येथे जन्मलेले डॉक्टर अंकित भरत यांनी सांगितले की कोविड -19 च्या गंभीर रूग्णांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यारोपण त्यांच्या जीवनाचा आधार बनतील.

व्हिडिओ कॉलवर कुटुंबीय बोलू शकते

डॉक्टर म्हणाले की, सध्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या कुटुंबातील सदस्यांना संसर्गाच्या जोखमीमुळे तिला भेटायला परवानगी नाही. तथापि, व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीय तरुणीशी बोलू शकतात. लवकरच ही तरुणी सामान्य जीवन जगू शकेल अशी आशा रुग्णालयाने व्यक्त केली आहे.