अखेरच्या दिवशी ‘ट्रम्प’ सरकारनं घेतला चीनचा समाचार, भारताला धोक्यापासून केलं सावध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा कार्यकाळ आज संपुष्टात येत आहे. काही तासांनंतर जो बिडेन (Joe Biden) हे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोप समारंभात अमेरिकन लोकांना शेवटच्या वेळी संबोधित केले. दरम्यान ट्रम्प यांनी 6 जानेवारी रोजी यूएस कॅपिटल हिल हिंसाचारा (US Capitol Hill Violence) वरील हिंसक हल्ल्याचा निषेध केला. त्याचबरोबर ट्रम्प सरकारने चीनला त्यांच्या वागणुकीमुळे इशारा देखील दिला. तसेच ट्रम्प सरकारने भारताला चीन आणि रशियापासून सतर्क राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.

ट्रम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी भारतासाठी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे ‘ब्रिक्स आठवते काय? जैर बोलसनोरो (ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष) आणि नरेंद्र मोदी यांचे आभार. बी आणि आय दोघांनाही माहिती आहे की सी आणि आर त्यांच्या लोकांसाठी धोकादायक आहेत. ब्रिक्स (BRICS) ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांची संघटना आहे. पोम्पिओने बी ब्राझील आणि आय इंडियासाठी या गोष्टी बोलल्या आहेत. ते सी (चीन) आणि आर (रशिया) यांच्याबद्दल म्हणाले आहेत की दोन्ही देश ब्राझील आणि भारतासाठी धोकादायक आहेत.

वास्तविक, पूर्व लडाखमधील सीमा वादावरून भारत आणि चीनमध्ये कित्येक महिन्यांपासून तणाव आहे. त्याचबरोबर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी नुकत्याच केलेल्या निवेदनामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी क्वाड गटावर कठोरपणे भाष्य करत भारताला चीनच्या विरोधात पाश्चात्य देशांच्या ‘सतत, आक्रमक आणि कपटी’ धोरणात एक मोहरा असल्याचे म्हटले होते. क्वाड गटामध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. या गटाकडे आशिया-पॅसिफिकमधील चीनविरोधी गट म्हणून पाहिले जात आहे.

चीनसाठी पोम्पिओने आणखी काय सांगितले ?
पोम्पिओ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मला विश्वास आहे की चीनचा हा नरसंहार अजूनही चालू आहे. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार नियोजित पद्धतीने स्थलांतरितांचा नाश करीत असल्याचे आपण पाहत आहोत.’ चीनच्या वायव्य शिनजियांगमधील वेगरांसंदर्भात चीनने केलेल्या कारवाईबाबत आतापर्यंतचे कठोर भाष्य पॉम्पीओ यांनी केले आहे. मानवाधिकार गटांचा असा विश्वास आहे की गेल्या काही वर्षांपासून चीनने लाखो वेगर मुस्लिमांवर पाळत ठेवली आहे. चीन सरकार या देखरेख शिबिरांना प्रशिक्षण शिबिर म्हणून संबोधत असते.

ट्रम्प यांनी केला कोरोनामुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख
ट्रम्प यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात प्राणघातक कोरोना विषाणूचा उल्लेखही केला. ट्रम्प म्हणाले, “चीनबरोबर आम्ही नवीन रणनीतीसह डील केली. आपले व्यावसायिक संबंध वेगाने बदलत होते. अमेरिकेत कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक होत होती, परंतु कोरोना विषाणूने आपल्याला वेगळ्या दिशेने जायला भाग पाडले.”

आपला कार्यकाळ आठवताना ट्रम्प म्हणाले, “आपण सर्वांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी एक मिशन सुरू केले. आपण जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण केली.” ते म्हणाले, “मला दशकांतील असा पहिला राष्ट्रपती असल्याचा अभिमान आहे, ज्याने नवीन कोणतीही लढाई सुरू केली नाही.”