‘इकॉनॉमिक’ कॉरिडॉरबाबत (CPEC) अमेरिकेचा पाकिस्तानला ‘इशारा’, चीनमध्ये ‘खळबळ’ तर भारतात ‘आनंद’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरविषयी (CPEC) अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानने या करारातून माघार घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने कठोर भूमिका घेतली तर पाकिस्तानकडे पर्याय राहणार नाही. अमेरिकेच्या या भूमिकेला भारताने पाठिंबा दर्शविला आहे. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला भारताचा विरोध आहे.

अमेरिकेचे मुत्सद्दी, ऐलिस वेल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर हा दक्षिण आशियामधील चीनचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचा फायदा फक्त बीजिंगला होईल. या करारातून पाकिस्तानला काहीही मिळणार नाही. या प्रकल्पाच्या चीनच्या हेतूविषयी पाकिस्तानला माहिती नाही. पाकिस्तानला प्रचंड कर्ज देऊन त्याचा आवाज दाबण्याचा चीनचा हेतू आहे. चीनने या प्रकल्पाच्या उभारणीत जी रणनीती अवलंबली आहे, त्यामुळे पाकिस्तानमधील बेरोजगारी वाढेल. केवळ चीनमधील कामगार प्रकल्पात ज्या प्रकारे काम करत आहेत त्यामुळे पाकिस्तानमध्ये भीषण बेरोजगारी निर्माण होईल.

या कारणामुळे भारताचा विरोध
या प्रकल्पाला भारतकडून विरोध होत आहे. कारण हा कॉरिडाॅर पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या विवादित प्रदेशातून जाईल. वाहतूक आणि ऊर्जा यांच्या प्रकल्पातून समुद्रातील बंदराचा विकास होईल आणि चीनला हिंद महासागरापर्यंत जाण्याचा मार्ग खुला होईल.

आर्थिक कॉरिडॉरची दीर्घकालीन योजना
18 डिसेंबर 2017 रोजी चीन आणि पाकिस्तान यांनी एकत्रितपणे या आर्थिक कॉरिडॉरच्या दीर्घकालीन योजनेस मंजुरी दिली. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला चीनने “वन बेल्ट आणि वन रोड” किंवा ‘न्यू सिल्क रोड’ प्रकल्प असेही म्हटले आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये प्रकल्प सुरु करण्यात आला. या योजनेंतर्गत चीन आणि पाकिस्तान 2030 पर्यंत आर्थिक भागीदार राहतील. यासह पाकिस्ताननेही या योजनेत चिनी चलन युआनच्या वापरास मान्यता दिली आहे. या कॉरिडॉरवर भारताने आपला आक्षेप दर्शविला आहे. हा कॉरिडोर पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ते बेकायदेशीर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने आपला विरोध दर्शविला आहे.

प्रकल्पाची किंमत 46 अब्ज डॉलर्स आहे
इकॉनॉमिक कॉरिडॉर हा चीनच्या शिनजियांग प्रांतातील काशगर ते पाकिस्तानातील ग्वादर बंदरापर्यंतचा 2,442 किमी लांबीचा प्रकल्प आहे. यासाठी चीन पाकिस्तानमध्ये एवढी मोठी रक्कम गुंतवत आहे की 2008 पासून पाकिस्तानमधील थेट परकीय गुंतवणूकीच्या (FDI) दुप्पट आहे. चीनची ही गुंतवणूक म्हणजे 2002 पासून पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणार्‍या एकूण आर्थिक मदतीपेक्षा जास्त आहे.

या प्रकल्पातून चीनला काय फायदा होईल
1) हा प्रकल्प चीनसाठी खूप महत्वाचा आहे. या कॉरिडॉरमुळे चीनला मध्य-आफ्रिका आणि आफ्रिकेपर्यंतचा सर्वात जवळचा मार्ग मिळेल, जिथे हजारो चिनी कंपन्या व्यवसाय करीत आहेत.

2) हा प्रकल्प शिनजियांगला कनेक्टिव्हिटी देखील देईल आणि मागासलेल्या भागात सरकारी आणि खासगी कंपन्यांना त्यांचे आर्थिक उपक्रम राबविण्याची संधी देईल, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

3) अमेरिकेने पाकिस्तानवर कुरघोडी करत आपली आर्थिक मदत कमी केली आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि भारताच्या वाढत्या जवळकीमुळे चीन पाकिस्तानशी असलेले संबंध अधिक मधुर बनवण्याचा करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानच्या विकासाला प्रोत्साहन देऊन चीनला भारतावर दबाव वाढवायचा आहे.

4) सध्या मध्य पूर्व, आफ्रिका आणि युरोपपर्यंत जाणारा चीनचा एकमेव व्यावसायिक मार्ग मलाक्का सामुद्रधुनी आहे; त्याचे अंतर खूप आहे तसेच तो युद्धादरम्यान देखील बंद केला जाऊ शकतो.

5) म्यानमार, बांगलादेश आणि शक्यतो भारतमार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत प्रवास करणाऱ्या पूर्व कॉरिडॉरसाठीही चीन प्रयत्न करीत आहे.

Visit : Policenama.com