खुशखबर ! ‘कोरोना’वरील उपचारासाठी पहिल्या औषधाला मंजुरी, रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) पहिल्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. ट्रायल म्हणून नव्हे तर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हे औषध वापरलं जाणार आहे. रेमडेसिवीर (Remdesivir) असं औषधाचं नाव आहे. असा दावा केला जात आहे की, या औषधामुळं कोरोना रुग्ण (Corona Patient) लवकरच बरा होतो.

हे औषध कॅलिफोर्निया गिलियड सायन्सेज (Gilead Sciences) कंपनीचं आहे. कोरोनावर उपचारासाठी अमेरिकेत (America) रेमडेसीवीर औषधाला आपत्कालीन मंजुरी दिली होती. आता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं या औषधाला उपचारासाठी मंजुरी दिली आहे. याशिवाय एफडीए (FDA) कडून मंजुरी मिळालेलं हे पहिलं औषध आहे.

औषधाबद्दल थोडक्यात माहिती
या औषधाबद्दल बोलायचं झालं तर हे एक अँटीव्हायरल औषध आहे. इबोलाच्या (Ebola) रुग्णांसाठी वापरण्यात आलेलं हे औषध कोरोनाला (Covid-19) रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. हे औषध घेतल्यानंतर शरीरात व्हायरसच्या प्रतिकृती तयार होत नाहीत आणि कोरोना रुग्ण 5 दिवस आधीच बरा होतो असा दावाही केला जात आहे.

कुणाला दिलं जाईल हे औषध ?
कमीत कमी 12 वर्षे आणि 40 किलो वजन असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. याशिवाय हायड्रोक्सिक्लोरोक्विन (Hydrpoxychloroquine) औषधासह हे औषध देऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. अन्यथा या औषधाच्या प्रभावावर परिणाम होईल.

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) गेल्या आठवड्यातच हे औषध रुग्णांसाठी परिणामकारक नसल्याचं सांगितलं होतं. मात्र हा अभ्यास फार जुना होता. याशिवाय या अभ्यासात प्लासबोशीही तुलना करण्यात आली नव्हती असं सांगितलं जात आहे.

अमेरिकेतील 2 कोरोना लशी (Corona Vaccine) फायजर (Pfizer) कंपनीची लस आणि मॉडर्ना इंक (Moderna) कपनीची लस यांना लवकरच परवानगी मिळू शकते. फायजर कंपनीच्या लशीत जर्मन कंपनी BioNTech ची भागीदारी आहे. लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केला जाणार आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे ज्याच्या अहवालाची सध्या प्रतिक्षा आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, मॉडर्ना कंपनीच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचे सकारात्मक परिणाम नोव्हेंबरमध्ये येण्याचा अंदाज आहे. जुलैमध्ये 30000 लोकांवर या लशीची ट्रायल सुरू करण्यात आली होती. सकारात्मक परिणाम आल्यानंतर डिसेंबरमध्येच या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते असं मॉडर्ना कंपनीचे सीईओ स्टिफन बँसेल (Stéphane Bancel)यांनी सांगितलं.