जगात प्रथमच एका दिवसात सापडले 5 लाख संक्रमित, यूरोपीय देशांनी उचलली कठोर पावले, पाकमध्ये 11 न्यायालये सील

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगात कोरोना महामारीचा कहर वाढतच चालला आहे. जगातील अनेक देशात दुसर्‍या टप्प्यातील महामारी वाढल्याने दररोजच्या नव्या प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. याच कारणामुळे जगभरात प्रथमच एका दिवसात विक्रमी 5 लाखांपेक्षा जास्त नवे कोरोना संक्रमित रूग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना रूग्णांचा एकुण जागतिक आकडा साडेचार कोटींच्या पुढे गेला आहे. जगात आतापर्यंत 11 लाख 80 हजारपेक्षा जास्त पीडितांचा मृत्यू झाला आहे.

दोन आठवड्यात वाढले 25 टक्के संक्रमित
रॉयटर वृत्तसंस्थेच्या आकड्यांवरून स्पष्ट होते की, जगात अवघ्या दोन आठवड्यात सुमारे 25 टक्के कोरोना संक्रमित वाढले आहेत. जगात मागील 23 ऑक्टोबरला प्रथमच चार लाखपेक्षा जास्त प्रकरणे आढळली होती. यानंतर मागील बुधवारी पाच लाखांपेक्षा जास्त नवे कोरोना पॉझिटिव्ह केस सापडल्या आहेत. जगात अमेरिका आणि बहुतांश यूरोपीय देश दुसर्‍या टप्प्यातील महामारीच्या संकटात आहेत. सर्वात जास्त प्रकरणे याच देशांमध्ये वाढत आहेत.

यूरोपीय देशांनी उचलली कठोर पावले
यूरोपीय देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी अनेक कठोर पावले उचलण्यात आली आहेत. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये तर लॉकडाऊन सुद्धा लावण्यात आला आहे. तर ब्रिटेन, स्पेन आणि इटलीमध्ये अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. रॉयटरच्या डाटानुसार, यूरोपमध्ये मागील दोन आठवड्यांच्या दरम्यान रोजची नवी प्रकरणे दुप्पट झाली आहेत. या खंडात बुधवारी अडीच लाखांपेक्षा जास्त केस आढळल्या. तर फ्रान्समध्ये मागच्या रविवारी प्रथमच 50 हजारपेक्षा जास्त संक्रमित सापडले होते.

अमेरिकेत विक्रमी 91 हजार संक्रमित
जगात कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने सर्वात ग्रस्त अमेरिकेत महामारी पुन्हा वाढू लागली आहे. या देशात गुरुवारी प्रथमच 91 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण आढळले. अमेरिकेत दुसर्‍या टप्प्यात महामारी अशावेळी वाढ झाली आहे, जेव्हा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला अवघे काही दिवसच उरले आहेत. अमेरिकेच्या मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, पेनिसिल्वेनिया, विस्कांसिन आणि ओहियो सारख्या राज्यांमध्ये कोरोना वेगाने पसरत आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकुण 92 लाखांपेक्षा जास्त संक्रमित आढळले आहेत. तर 2 लाख 30 हजारपेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानमध्ये 11 न्यायालये सील
इस्लामाबादमध्ये न्यायाधीश आणि कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यानंतर 11 न्यायालये सील करण्यात आली आहेत. सील करण्यात आलेल्या न्यायालयांमध्ये 3 अतिरिक्त आणि सत्र न्यायाधीशांची आहेत. 1 वरिष्ठ दीवाणी न्यायाधीश आणि 7 दीवाणी न्यायाधीशांची न्यायालये सील करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे, काही वकिलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बार असोसिएशनने म्हटले आहे की, 11 न्यायाधीश आणि कर्मचारी संक्रमित झाले आहेत. यासाठी न्यायालये पुढील 14 दिवसांसाठी बंद राहतील.