Coronavirus : प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत कसा पोहचला ‘कोरोना’ ? वैज्ञानिकांना मिळाला महत्वाचा ‘पुरावा’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगभरात शास्त्रज्ञ कोरोनावरील लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच हेही शोधत आहेत की, या व्हायरसची उत्पत्ती कुठून झाली. शास्त्रज्ञांना एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरोना आकार बदलून प्राण्यांमधून मानवांमध्ये येण्यास आणि त्यांना संक्रमित करण्यास सक्षम आहे. शास्त्रज्ञांनी या अभ्यासात कोरोना आणि त्याचे प्राण्यांमधील नमुन्यांचे अनुवांशिक विश्लेषण केल्यावर हा निष्कर्ष काढला आहे.

शास्त्रज्ञांना असे आढळले की, सर्वात जवळचा तोच व्हायरस आहे जो वटवाघूळांना संक्रमित करतो. संशोधकांच्या टीममध्ये अमेरिकेच्या अल पासो येथील टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांचाही समावेश होता. हा अभ्यास सायन्स अ‍ॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की, सार्स-कोव्ह-२ विषाणूची मानवांना संक्रमित करण्याची क्षमता पँगोलिनला संक्रमित करणार्‍या कोरोनाच्या एका महत्वाच्या जनुकाच्या अदला-बदलीशी संबंधित आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा प्राणघातक विषाणू त्याचे अनुवांशिक गुणधर्म बदलून संक्रमित व्यक्तीच्या पेशींमध्ये राहू शकतो. या व्हायरसची क्षमता अशी आहे, ज्यामुळे तो एका प्रजातीमधून दुसर्‍या प्रजातीमध्ये प्रवेश करू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, या व्हायरसची क्षमता इतकी आहे की, तो प्रत्येक पेशीमध्ये प्रवेश करू शकतो. आम्ही असेही म्हणू शकतो की, त्याच्याकडे एक चावी आहे जी सर्व प्रकारच्या पेशींचे कुलूप उघडण्यास सक्षम आहे.

अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील संशोधक फेंग गाओ म्हणाले की, सार्स किंवा मर्सप्रमाणे कोरोना देखील आपल्या अनुवांशिक गुणधर्मांमध्ये बदल करण्यास सक्षम आहे. याच गुणांमुळे तो मानवांना आजारी पाडू शकतो. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, त्यांच्या या अभ्यासामुळे भविष्यात विषाणूमुळे होणाऱ्या महामारीपासून बचाव होईल. इतकेच नाही तर हा अभ्यास या विषाणूची लस तयार करण्यातही उपयुक्त ठरेल.