अमेरिका – इराण युध्दामुळं भारताला ‘या’ 10 गोष्टींचं मोठं नुकसान, मोदी सरकारचं स्वप्न ‘भंग’ होणार !

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – अमेरिका आणि इराणमध्ये ज्या प्रकारे तणावाची पातळी वाढत आहे, ते पाहता भारत चिंताग्रस्त आहे. सध्याच्या परिस्थितीत भारतासाठी जेवढी अमेरिका महत्वाची आहे, तेवढेच इराण. या दोन्ही देशांमधील युद्धामुळे भारताला दुप्पट धक्का बसणार आहे. यासाठी भारत सतत दोन्ही देशांच्या संपर्कात असून तणाव कमी करण्याची भूमिका पार पाडत आहे.

स्थितीवर भारताची बारीक नजर
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्थितीवर बरीक लक्ष ठेवून आहेत. जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले तर अशा परिस्थितीत खाडी परिसरातील आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ओमान आणि युएईची मदत घ्यावी लागू शकते. या दोन्ही देशांत लाखो भारतीय राहतात. यापूर्वीही युद्धस्थितीत भारताला आपल्या नागरिकांना बाहेर काढावे लागले होते. सोबत हे दोन्ही देश भारताला तेलाचा पुरवठा करतात.

आकडेवारीनुसार पश्चिम आशियातील देशांमध्ये सुमारे 50 लाख भारतीय राहतात. यातील बहुतांश लोक फारस खाडीच्या किनार्‍यावरील परिसरात राहतात. मोठ्या संख्येने भारतीय नागरिक इराणजवळील संयुक्त अरब अमिरात, बहरीन, कतार आणि कुवेतमध्ये राहतात. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार केवळ इराणमध्ये 4000 भारतीय राहतात.

इराणसोबत तणाव वाढत असताना ट्रम्प प्रशासनाला या भागातील आपली पकड मजबूत करण्यासाठी पाकिस्तानची मदत घ्यावी लागणार आहे. आपल्या बाजूने पाकिस्तानला वळविण्यासाठी अमेरिका पकिस्तानला आर्थिक मदत करू शकते. यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकला घेरण्याच्या भारताच्या मोहिमेला झटका बसू शकतो. सोबतच आफगाणिस्थानातही भारताच्या हितसंबंधांचे नुकसान होऊ शकते. या कारणासाठीच भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणशी संपर्क साधला आहे. भारत आणि इराणचे अफगाणिस्थानबाबत समान विचार आहेत. भारताला या दोन्ही देशातील तणावामुळे 10 मोठे धक्के बसणार आहेत.

1 तेलाच्या किमती वाढणार
भारत आपल्याला लागणार्‍या एकुण तेलापैकी 83 टक्के तेल आयात करतो. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे कच्चा तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. शुक्रवारी ब्रेंट कच्चे तेल 4.4 टक्क्यांनी वाढून 69.16 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. तर शुक्रवारी रूपया 42 पैशांनी घसरून 71.80 प्रति डॉलरवर पोहचला होता. युद्धाच्या स्थितीत परकीय चलनावरही परिणाम होणार आहे. परकीय चलनात वाढ झाल्यास मंदी आणखी वाढेल. खाण्या-पिण्याच्या वस्तू, वाहतूक, रेल्वे, खासगी ट्रान्सपोर्टवरही वाईट परिणाम होईल. बेरोजगारी आणखी वाढू शकते.

2 तेलाचा पुरवठा बाधित होण्याची शक्यता
दोन्ही देशात जर युद्ध झाले तर भारताला कच्चे तेल आयात करण्यात अनेक अडचणी येतील. मागील दोन वर्षातील अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे भारताने इराणकडून करण्यात येणार्‍या आयातीत मोठी कपात केली आहे. परंतु, आजही भारतात मोठ्या प्रमाणात इराक, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरातमधून आयात केली जाते. ही आयात फारस खाडीतून होरमुज कॉरीडॉरमधून होते. आर्थिक मंदीच्या या काळात महाग तेल आयात करणे भारताला न परवडणारे आहे.

3 शेअर मार्केटमध्ये भूकंप
अमेरिका आणि इराणमधील तणावाचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर दिसत आहे. भारतीय शेअर मार्केटही यातून सुटलेले नाही. शुक्रवारी सेंसेक्स 162.03 अंकावरून घसरून 41,464.61 वर बंद झाला, निफ्टीची क्लोजिंग 55.55 पॉईंट खाली 12,226.65 वर झाली. यानंतर सोमवारी बाजारात भूकंप आला आहे. सेंसेक्स 700 अंक आणि निफ्टी 200 पेक्षा जास्त अंकाने घसरला. परदेशी गुंतवणुकदार मोठ्या संख्येने भारतीय बाजारातील पैसे काढून घेत आहेत. तर भारतीय गुंतवणूकदार घाबरलेले आहेत.

4 सोने वधारले
आर्थिक अनिश्चिततेमुळे प्रत्येक गुंतवणुकदार सोन्यासारखा सुरक्षित पर्याय निवडत आहे. ज्यामुळे सोन्याचे दर सतत वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर चार महिन्यातील उच्चांकावर आहेत. भारतातील वायदा बाजारात सोमवारी सोने 41000 रूपये प्रति 10 ग्रॅमची पातळी तोडून वर पोहचले. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पुढील तीन महिन्यात बुलियनमध्ये तेजी राहू शकते.

महागाई होईल अनियंत्रित
कच्च्या तेलाचे दर वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. इंधनाचे दर वाढल्याने महागाई वाढेल. याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होईल. सरकार सतत महागाई दरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका-इराणमधील युद्धाच्या स्थितीमुळे महागाई दरामुळे सरकारला चांगलाच धक्का बसू शकतो. नोव्हेंबरमध्ये महागाई दरात मोठी वाढ नोंदवली गेली. नोव्हेंबरमध्ये महागाईदर 4.62 टक्क्यांवरून वाढून 5.54 टक्के झाला.

6 आर्थिक तोटा वाढेल
मोदी सरकार अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आर्थिक तोटा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत देशाचा आर्थिक तोटा 8.07 लाख कोटी रूपये आहे. आर्थिक तोट्याला जेव्हा लगाम बसेल तेव्हा आर्थिक विकास शक्य होईल. परंतु, इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे सरकारचे उत्पन्न घटेल आणि खर्च वाढेल. यामुळे आर्थिक तोटा कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मोठा फटका बसू शकतो.

7 घरी परततील खाडी क्षेत्रातील नागरिक
जर अमेरिका आणि इराणमध्ये तणाव आणखी वाढला तर खासकरून खाडी देशात राहणारे नागरिक पुन्हा देशात परततील. यामुळे भारताला आर्थिक पातळीवर मोठे नुकसान सोसावे लागेल. कारण खाडी देशात बहुतांश लोक हे कमाईसाठी गेले आहेत आणि तेथून मोठ्याप्रमाणात ते आपल्या घरी पैसा पाठवत असतात. जो पैसा येतो तो परदेशी चलन साठ्यातील मोठा हिस्सा होतो. जर हे लोक परत आले तर भारताचे मोठे नुकसान होईल.

8 गुंतवणुकीवर होईल परिणाम
भारताचे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हे दोन देश भारतासाठी महत्वाचे आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास भारताचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. भारताचा 100 अब्जापेक्षा जास्त व्यापार खाडी देशांशी होतो, आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही याच भागातून होते. विशेषकरून चाबहार बंदरावर परिणाम होऊ शकतो. भारत आणि इराणमध्ये 2014 मध्ये चाबहार बंदर आणि जाहेदान रेल्वे प्रकल्पाचा करार झाला होता. दोन्ही देशांमध्ये चाबहार बंदर विकासासाठी 58 मिलियन डॉलर गुंतवणुकीचा करार झाला होता, युद्धाच्या स्थितीत यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

9 निर्यातीवर परिणाम
मागील आर्थिक वर्षात भारताने 32,800 कोटी रूपयांचे बासमती तांदूळ निर्यात केले होते. ज्यापैकी सुमारे 10,800 कोटी रूपयांचा बासमती तांदूळ केवळ इराणला निर्यात केला होता. यावेळीही तांदूळ निर्यातीबाबत इराणशी करार झाला आहे. परंतु, युद्ध स्थितीत या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. तसेच चहा निर्यातीलाही झटका बसू शकतो.

10 पाच ट्रिलियनचे लक्ष्य पूर्ण होणार नाही
मोदी सरकारने 2024 पर्यत भारताला 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा देश बनविण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. या उद्दीष्टापर्यंत पोहचण्यासाठी अमेरिका आणि इराणची अप्रत्यक्ष गरज भासणार आहे. भारतात हे दोन्ही देश मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करण्याची अपेक्षा आहे. कारण, 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी परदेशी गुंतवणुकीची भूमिका महत्वाची असणार आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, सरकारी गुंतवणुकीने हे लक्ष्य साध्य करणे अशक्य आहे. अशा स्थितीत अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास भारत हे लक्ष्य पूर्ण करू शकणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/