Coronavirus : चोराला देखील चिंता ! हॉस्पीटलमधून बॅग भरून चोरले कोरोनाचे ‘किट’, चोरटा CCTV मध्ये कैद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. सर्व देश व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत. संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेगळे ठेवण्यात येत आहे. परंतु या सर्वांच्या दरम्यान भारत ते अमेरिकेपर्यंत एक प्रश्न उद्भवत आहे की, सरकार लोकांची मोठ्या प्रमाणात चाचणी का करत नाही ? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारांकडे चाचणी किट मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. मात्र, याचदरम्यान अमेरिकेतील रूग्णालयातून अनेक डझनभर टेस्ट किट चोरल्याची घटना समोर आली आहे.

अमेरिकेच्या एरिझोना येथे एका व्यक्तीने बॅग भरुन कोरोना व्हायरस चाचणी किट त्याच्यासोबत घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. संशयित युवकाचा फोटोही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

स्थानिक पोलिसांनी कोरोना व्हायरस टेस्ट किट चोरी करणाऱ्या व्यक्तीचे फोटो प्रसिद्ध करुन त्याला ओळखण्यासाठी मदत मागितली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चोराने अ‍ॅरिझोनामधील एल रिओ हेल्थ सेंटरमधून चाचणी किट चोरल्या आहेत.

कोरोना व्हायरस टेस्ट किट शुक्रवारी चोरीला गेले. परंतु शनिवारपर्यंत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांना चोरीची जाणीव झाली नाही. नंतर, चोरीच्या किट्सच्या ऐवजी रुग्णालयात नवीन किट उपलब्ध करुन देण्यात आल्या, त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. संशयिताबद्दल काही माहिती मिळाल्यास सामान्य लोकांनी त्वरित शेअर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचवेळी चोर डिलिव्हरी चालक म्हणून दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांना कोणाकडूनही कोरोना व्हायरस टेस्ट किट खरेदी करू नये असे आवाहन केले आहे. अमेरिकेत 35 हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, तर 450 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चाचणी किटच्या कमी पुरवठ्यामुळे देश झगडत आहे. त्याच वेळी, भारतात कोरोना व्हायरस लागण झालेल्या लोकांची संख्या 420 हून अधिक झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे.