Coronavirus : ‘कोरोना’मुळं अमेरिकेत टाळली फाशीची शिक्षा, इटलीत 24 तासात 345 जणांचा मृत्यू, जाणून घ्या जगभरातील परस्थिती

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – चीननंतर संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. जगभरातील तब्बल दोन लाख लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर 7 हजार 900 पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. अमेरिकेच्या एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, या व्हायरसमुळे अमेरिकेसारख्या विकसीत देशाच्या 50 राज्यामध्ये 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये मागील 24 तासात 345 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 31 हजार 506 झाली आहे. तर 2 हजार 60 लोकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

भारतात 150 जणांना लागण
ऑस्ट्रेलियामध्ये 450 हून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने नागरिकांना परदेशात प्रवास करू नये असा आदेश दिला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारने देशात आणिबाणी लागू केली आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारावर झाला आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानसार ऑस्ट्रेलियाच्या समभागात सहा टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचवेळी चीनमधील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. भारतात कोरोना व्हायरसचे 150 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. भारतात कोरोना व्हायरसमुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

वुहानमध्ये परिस्थिती नियंत्रणात
कोरोना व्हायरसचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमधील वुहान शहरात परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी वुहान शहरामध्ये केवळ एक रुग्ण आढळून आला आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 3 हजार 237 वर पोहचला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) म्हटले आहे की, मंगळवारी देशात कोरोना व्हायरसमुळे 11 जणांचा मृत्यू झाला. तर 13 नवीन रुग्ण आढळून आल्याची नोंद झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे वुहान आणि हुबेई प्रांत 23 जानेवारीपासून बंद ठेवण्यात आला आहे. तसेच टाइम मॅगझीनने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील टेक्सासमधील एका कोर्टाने 60 दिवसांसाठी फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.