जगातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 60 लाखांवर, एकाच दिवसात ब्राझीलमध्ये 33 हजारांहून जास्त रूग्ण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या 60 लाखांहून अधिक आहे. चीन, युरोप आणि अमेरिकेनंतर आता हा आजार लॅटिन अमेरिकन देश ब्राझील, चिली आणि मेक्सिकोमध्ये कहर माजवत आहे. ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासांत विक्रमी 33,724 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही देशात संक्रमित रूग्णांची संख्या एकाच दिवसात एवढी आढळली नव्हती. अशाप्रकारे देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 5,01,985 वर पोहोचली आहे. मृतांच्या आकडेवारीत ब्राझील 28,872 संख्येसह यूएसए, यूके आणि इटलीनंतर चौथ्या क्रमांकावर आहे. जगभरात संक्रमित रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता 10 जानेवारी रोजी वुहानमध्ये 40 रुग्ण आढळले आहेत. 1 एप्रिल रोजी संक्रमित रूग्णांची संख्या 10 लाख झाली होती. यानंतर, दर दोन आठवड्यांनी संक्रमित रुग्णांची संख्येत 10 लाखांनी वाढ झाली. विशेष म्हणजे, संक्रमित रूग्णांची संख्या वाढत असूनही, अनेक देश निर्बंध हटवत आहेत आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी पावले उचलत आहेत.
पाकिस्तानचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
पाकिस्तानमधील नारकोटिक्स कंट्रोलचे राज्यमंत्री शहरेयार आफ्रिदीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्हला आली आहे. त्याने ट्विटरवरुन ही माहिती दिली. आफ्रिदीने ट्विट केले की, ‘मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून मी घरी स्वत: ला क्वारंटाईन केले आहे. मला दुवा आणि प्रार्थनेची गरज आहे. माझ्या देशातील नागरिकांना या साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी मी दुवा करतो. ‘ सिंधनचे राज्यपाल इमरान इस्माईल आणि नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर हे शहरेयार यांच्या आधी कोरोना संक्रमित असल्याचे आढळले. मात्र, दोघेही आता या आजारातून मुक्त झाले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानात संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 69,474 झाली आहे. तर मृतांचा आकडा वाढून 1,483 झाला आहे.
सौदी अरेबियामध्ये मशिदी उघडल्या
रविवारी सौदी अरेबियामध्ये मशीद पुन्हा उघडल्या. दरम्यान, नमाज पठण करण्यासाठी येणार्या लोकांना मास्क लावण्याबरोबर हात मिळविणे आणि कोणालाही मिठी मारण्यास मनाई असेल. 15 वर्षांखालील मुलांना मशिदींमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र, मुस्लिमांचे पवित्र स्थान, मक्का हे काही काळ बंद राहील.
जेरुसलेममध्ये अल अक्सा मशीद उघडली
रविवारी मक्का आणि मदीना नंतर मुस्लिम बांधवांची तिसरी पवित्र जागा अल-अक्सा मशीद रविवारी उघडण्यात आली. जेरुसलेममध्ये ही मशिदी उघडण्याआधीच लोक बाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते. सर्वांनी सर्जिकल मास्क घातले होते. मशिदीत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाचे तापमान घेतले गेले. दुसरीकडे, कोरोनामध्ये वाढ असूनही, इस्त्रायली आरोग्यमंत्री म्हणाले की, शाळा बंद होऊ नयेत. दरम्यान, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, एकदा संसर्ग वाढला की पुन्हा एकदा बंदी लागू केली जाऊ शकते.
रशियामध्ये 138 लोकांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात रशियामध्ये आणखी 138 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनामधील मृतांची संख्या 4,693 वर पोहोचली आहे. संसर्गाची 9,268 नवीन प्रकरणे आल्याने तेथे संक्रमित रूग्णांची संख्या 405,843 झाली आहे. तसेच सिंगापूरमध्ये संसर्गाची 518 नवीन प्रकरणे नोंदविली गेल्याने संक्रमित रूग्णांची एकूण संख्या 34,884 पर्यंत वाढली आहे. बहुतेक प्रकरणे वसतिगृहातील रहिवासी परदेशी कामगारांशी संबंधित आहेत. त्याचबरोबर स्पेनमध्ये लॉकडाउन 21 जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे. तर चीनमध्ये कोरोनाची दोन नवीन प्रकरणे समोर आली असून लक्षणे नसलेले चार रुग्णही आढळले आहेत. यात जर्मनीहून चार्टर्ड फ्लाइटमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मलेशियामध्ये 57 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. तेथे आतापर्यंत 115 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देश मृत्यू रुग्ण सक्रिय प्रकरण
अमेरिका 1,05,580 18,18,405 11,77,464
ब्रिटन 38,376 2,72,826 उपलब्ध नाही
इटली 33,340 2,32,664 43,691
ब्राझील 28,872 5,01,985 2,67,742
फ्रान्स 28,771 1,88,625 91,586
स्पेन 27,125 2,86,308 62,225
बेल्जियम 9,467 58,381 33,207
जर्मनी 8600 1,83,294 9,494
इराण 7,797 1,51,466 24,821
रशिया 4,693 4,05,643 2,29,267
चीन 4,634 83,001 63