फंडिंग कायमस्वरूपी बंद करेल, चीनच्या मोहातून बाहेर पडा, नाराज ट्रम्प यांनी WHO ला सांगितलं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, जर जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) येत्या 30 दिवसांत चीनच्या तावडीतून बाहेर येऊ शकला नाही तर अमेरिका आपला निधी कायमचा बंद करेल. इतकेच नव्हे तर डब्ल्यूएचओच्या सभासदत्वातून माघार घेण्याबाबतही अमेरिका विचार करेल.

डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस अधानोम घब्रेयेसस यांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प म्हणाले की, ‘हे स्पष्ट आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीपासून वाचण्यासाठी आपली संस्था आणि आपण वारंवार चुकीची पावले उचलली आहेत ज्यामुळे जगाला खूप किंमत मोजावी लागत आहे. या पलीकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या तावडीतून मुक्त होणे.’

चार पानांच्या पत्रात ट्रम्प म्हणाले की, ‘संस्था सुधारण्यासाठी माझ्या सरकारने तुमच्याशी (महासंचालक) यांच्याशी आधीच चर्चा सुरू केली आहे, पण आत्ताच त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. आम्हाला वेळ वाया घालवायचा नाही.’ 14 एप्रिलला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओला दरवर्षी देण्यात येणारी 500 मिलियन डॉलर्स (सुमारे 3500 कोटी) रक्कम थांबविली होती. अमेरिकेचा आरोप आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या प्रभावामुळे वुहानपासून कोरोना व्हायरस साथीचा रोग लपविला आहे.

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये डब्ल्यूएचओवरही टीका केली. ते म्हणाले की, ‘ते (डब्ल्यूएचओ) चीनचे कठपुतळे आहेत. ते चीन केंद्रित आहेत असे म्हणणे योग्य आहे. अमेरिका डब्ल्यूएचओला वर्षाकाठी 450 मिलियन (सुमारे 3500 कोटी रुपये) देते. तर चीन केवळ 38 मिलियन डॉलर्स (सुमारे 290 कोटी रुपये) देते. आमच्याशी चांगली वागणूक दिली जात नसल्याने हे कमी करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.

ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, जर त्यांनी चीनमधून प्रवास करण्यास बंदी घातली नसती तर कोरोना विषाणूमुळे देशात अधिक लोकांचा बळी गेला असता. डब्ल्यूएचओने या बंदीला विरोध दर्शविला होता. ट्रम्प म्हणाले की, अध्यक्षपदाचे उमेदवार आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी उपाध्यक्ष जो बिडेनदेखील या बंदीच्या विरोधात होते.