प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या, ट्रम्प यांचे आवाहन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत प्लाझ्मा थेरेपीमुळे सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. भारतातही काही कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन रेड क्रॉसच्या मुख्यालयाचा काल दौरा केला. त्यावेळी त्यांनी कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने कोरोना विषाणूवरील उपचार शोधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जर तुम्ही कोरोनामुक्त झाला असाल तर इतरांचे जीवन वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान करा. आपण एकत्रितरित्या या संकटावर मात करू, असे ट्रम्प म्हणाले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीची मदत होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. याद्वारे कोरोनाचा सामान्य रुग्ण 5 दिवस आधीच आजारपणातून बाहेर येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 46.29 लाखांपेक्षा अधिक लोकांना बाधा झाली आहे. त्यापैकी 22 लाखांपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अमेरिकेत सद्यस्थितीत 21.97 लाख अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.