वडिलांकडून होणार्‍या छळाला घाबरायचे डोनाल्ड ट्रम्प !

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वी डोनाल़्ड ट्रम्प यांच्या जीवनावर त्यांच्या भाचीने लिहिले आहे. पुस्तकात मेरी ट्रम्प यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बालपणाबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. बालपणी ट्रम्प यांच्या वडिलांकडून त्यांचा छळ होत होता आणि आजही डोनाल्ड ट्रम्प हे तीन वर्षांच्याच मुलाप्रमाणे असल्याचा दावा ‘टू मच अँड नेव्हर इनफ: हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन’ या पुस्तकातून करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वडिलांना प्रेमाचा अर्थच माहित नव्हता. त्यांना केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करून घेता येत होता. डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील जबरदस्ती त्यांच्या आज्ञेचे पालन करावे लागत होते, असा दावा मेरी ट्रम्प यांनी पुस्तकातून केला आहे. मेरी ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ बंधू फ्रेड ज्यूनियर यांच्या कन्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे दोन वर्षांचे असताना त्यांची आई आजारी पडली आणि तेव्हापासून ट्रम्प यांच्या वडिलांनी त्यांचे संगोपन करत होते. ते आपल्या कामात इतके व्यस्त होते की डोनाल्ड ट्रम्प यांच्या संगोपनावर त्यांचेअधिक लक्ष नव्हते. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी नसल्याचंही त्यांना वाटत होते. याचाच परिणाम डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनावर झाला, असा दावा मेरी ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आताही बर्‍यापैकी तसेच आहेत जसे ते तीन वर्षांचे असताना होते. त्यांना कसे वाढवायचे, शिकणे किंवा चांगले होणे, भावनांना आवर घालणे, प्रतिक्रिया देताना विचार करणे असे प्रकार जमत नाहीत, असेही पुस्तकाच्या मागील बाजूला नमूद करण्यात आले आहे.