US : सत्तेत आल्यास भारताला देणार ‘हे’ मोठे गिफ्ट, बायडन यांच्या घोषणेने डोनाल्ड ट्रम्प यांना ‘धक्का’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास भारतासोबत असलेले द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करणार असल्याचं बायडन यांनी जाहीर केलं आहे. तसेच प्रसंगी एच-1 बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णयात बदल करू, असेही त्यांनी सांगितलं. ते डिजिटल टाऊन हॉल येथे बोलत होते.

बायडन यांना उपस्थित नागरिकांनी तुम्ही निवडून आल्यास पहिल्या शंभर दिवसांत तुमचे प्रशासन काय करेल,असा प्रश्न विचारला. यावर बोलताना बायडन म्हणाले, एच-1बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं काही दिवसांपूर्वी घेतला. माझ्या प्रशासनात या नियमात बदल करण्यात येईल. त्यावेळी तो निर्णय असेल. एच-1बी व्हिसाच्या माध्यमातून आलेल्या लोकांनी या देशाच्या जडणघडणीत मोठा हातभार लावला आहे. देशाच्या उभारणीमध्ये त्यांचही मोठं योगदान आहे. भारतातल्या आयटी कंपन्यांकडून एच-1बी व्हिसाला मोठी मागणी असते. अमेरिकेतील रोजगार तिथल्या स्थानिकांना मिळावा, यासाठी विद्यमान राष्ट्रध्यक्षांनी हा व्हिसा वर्षाअखेरपर्यंत रद्द केला आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकल्यास अमेरिकेचा नैसर्गिक मित्र असलेल्या भारताबरोबरील सामरिक भागिदारी वाढविण्यास आपले प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देईल, असे बायडन म्हणाले. प्रादेशिक स्तरावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारतासोबत असणे आवश्यक आहे. भारत-अमेरिका अणुकराराला काँग्रेसची मंजुरी मिळवण्यामध्ये मी भूमिका बजावली आहे, याचा मला अभिमान आहे. मी निवडून आलो तर या संबंधांना बळकटी देईल, असेही त्यांनी सांगितले.