Coronavirus : ‘कोरोना’ची दहशत, इटलीमध्ये 25% लोक घरात घरात ‘कैद’, अमेरिकेत 19 जणांचा मृत्यू, न्यूयॉर्कमध्ये ‘आणीबाणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीननंतर सगळ्यात जास्त कोरोना विषाणूचा संसर्ग असणाऱ्या इटलीमध्ये या विषाणूला रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलली जात आहेत. लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकांना घरात कैद राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण देशभरात ३ एप्रिलपर्यंत शाळा, सिनेमाघरे, नाईट क्लब आणि संग्रहालये, विविध थिएटर बंद करण्यात आली आहेत. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा कोरोना विषाणू आतापर्यंत ९५ देशांमध्ये पोहोचला आहे. इटलीचे पंतप्रधान जिएसेपे कॉन्टे यांनी विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या उत्तर भागातील लोकांना कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय हालचाल न करण्यास सांगितले आहे.

इटलीमध्ये आतापर्यंत ५८८३ संक्रमित, तर २३३ लोकांचा मृत्यू
व्हेनिस आणि आर्थिक राजधानी मिलानसह उत्तर इटलीच्या ज्या क्षेत्रांना वेगळे केले गेले आहे, तेथे सुमारे दीड कोटी लोक राहतात. या युरोपियन देशात शनिवारी सर्वात जास्त म्हणजेच जवळपास १२४७ इतके रुग्ण आढळले आहेत. ६ कोटी लोकसंख्या असणाऱ्या इटलीमध्ये आत्तापर्यंत ५८८३ लोकांना संसर्ग झाला असल्याचे समोर आले असून त्यापैकी २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सेवानिवृत्त डॉक्टरांची देखील सेवा घेतली जात आहे.

हायलाइट्स:

  • डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, चीनबाहेरील ९३ देशांत आतापर्यंत २१,११४ लोकांना संसर्ग तर ४१३ लोकांचा मृत्यू
  • लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिनामध्ये पहिला मृत्यू, पराग्वे, कोलंबिया, चिली आणि पेरू येथेही पहिल्या घटना आल्या समोर
  • थायलंड आणि मलेशिया ने कोरोनाच्या भीतीने कोस्टा फॉर्चुना क्रूझला केले परत, क्रूझमध्ये होते दोन हजार प्रवासी
  • मालदीवने दोन रिसॉर्ट्स बंद केली, कुरेदू आयलँड रिसॉर्टमध्ये १४०० हून अधिक लोक होते उपस्थित

दक्षिण कोरियात शेकडो चर्च बंद
दक्षिण कोरियामध्ये रविवारी शेकडो चर्चचे दरवाजे बंद राहिले. या सर्व चर्च मध्ये रविवारी प्रार्थना सभा ऑनलाईन घेण्यात आल्या. तथापि, या आशियाई देशात गेल्या आठवड्यात सर्वात कमी संक्रमणांची नोंद झाली आहे. चीननंतर या देशात सर्वाधिक संक्रमित लोक आहेत. दक्षिण कोरियामध्ये ७३१३ लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी चीनमध्ये एका महिन्यातील सर्वात कमी मृत्यूची नोंद
रविवारी चीनमध्ये आणखी २७ लोकांचा बळी गेला आहे. गेल्या एका महिन्यात हे सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण आहे. आतापर्यंत देशात ३०९७ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि ८०,६९५ लोक संक्रमित झाले आहेत. मध्य चीनचा हुबेई प्रांताला या विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. याच प्रांताची राजधानी वुहानपासून हा विषाणू पसरला आहे.

इराणमध्ये एका दिवसात ४९ मृत्यू
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की चीन आणि इतर काही देशांनी त्यांच्या प्रयत्नातून हे सिद्ध केले आहे की मजबूत नियंत्रण आणि प्रतिबंधक कार्यातून या विषाणूचा प्रादुर्भाव कमी केला जाऊ शकतो. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, देशात विषाणूमुळे एका दिवसात सर्वात जास्त ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमधील सर्व ३१ प्रांतांमध्ये हा विषाणू पसरला आहे. देशात आतापर्यंत १९४ मृत्यूंची नोंद झाली असून ६,५६६ घटनांची पुष्टी झाली आहे.

अमेरिकेत १९ लोकांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे अजून २ लोकांचा मृत्यू झाल्याने ही संख्या वाढून १९ झाली आहे. दोन्ही मृत्यू वॉशिंग्टन प्रांतात झाले. संपूर्ण देशभरात ४०० हून अधिक लोक संक्रमित आहेत. न्यूयॉर्कमध्ये ८९ प्रकरणांच्या पुष्टीनंतर आपत्कालीनची घोषणा करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियामध्ये आधीपासूनच आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. या प्रांतातील सॅन फ्रान्सिस्को शहराच्या किनारपट्टीवरील ग्रँड प्रिन्सेस क्रूझमध्ये सुमारे ३५०० लोक अडकले आहेत. या क्रूझवरील २१ लोकांमध्ये व्हायरसची पुष्टी झाली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार क्रूझला प्रांतातील ओकलँड डॉक येथे थांबवण्यात येईल.