आता डोनाल्ड ट्रम्पही म्हणाले 2024 मध्ये मी पुन्हा येईन !

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था  –   एका हॉलिडे पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन, असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरून ते पुन्हा एकदा 2024 ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही चार वर्षे खूपच छान होती, असेदेखील ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल म्हटले आहे. या पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते.

डेमोक्रॅटिक पार्टीचे जाे बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे.

2024 मध्ये प्रचाराला प्रारंभ

आम्हाला आणखीन चार वर्षे सेवेसाठी मिळावेत. म्हणूनच मी तुम्हाला भेटण्यासाठी चार वर्षांनंतर पुन्हा येईन, असे म्हटले आहे. एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प हे 20 जानेवारी 2024 रोजी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये ट्रम्प यांनी आपले वकील 2020 चे निकाल बदलू शकले नाहीत, तर आपण 2024 ची निवडणूक लढू असे म्हटले होते.

… तर 66 टक्के रिपब्लिकन मतदार करतील मतदान

सेव्हन लेटर इनसाइड नावाच्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ट्रम्प यांनी 2024 ची निवडणूक लढवली, तर 66 टक्के रिपब्लिकन मतदार त्यांना मतदान करतील असे दिसून आले आहे. मॉर्निंग-कन्सल्ट-पोलिटिकोच्या सर्वेक्षणामध्ये 54 टक्के रिपब्लिकन मतदारांनी पक्षाकडून निवडण्यात येणाऱ्या उमेदवाराच्या निवडीमध्ये ते प्राथमिक उमेदवार म्हणून ट्रम्प यांच्या बाजूने मत देतील असे म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.