Coronavirus : अमेरिकेत मृत्यूचं रेकॉर्ड तुटलं, 24 तासांत 1480 लोकांनी गमावले ‘प्राण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने अमेरिकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासात येथे सुमारे 1500 लोक मरण पावले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ट्रॅकरच्या म्हणण्यानुसार, गुरुवार ते शुक्रवार हा अमेरिकेसाठी अतिशय वाईट दिवस होता आणि येथे 1480 लोक मरण पावले आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे जगातील कोणत्याच देशात 24 तासांच्या आत एवढ्या जास्त लोकांचा मृत्यू झाला नव्हता.

7 हजारांहून अधिक मृत्यू
ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत 7406 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्येच सुमारे 3000 लोक मरण पावले आहेत आणि दर तासाला ही आकडेवारी खूप वेगाने वाढत आहे. इतकेच नाही तर येथे कोरोना विषाणूची लागण एक लाखाहून अधिक लोकांना झाली आहे. तर संपूर्ण अमेरिकेत संक्रमित लोकांची संख्या अडीच लाखांवर गेली आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अॅंड्र्यू कुओमो यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे इतर अमेरिकन राज्यपालांना कोरोना विषाणूच्या साथीवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

त्याचबरोबर अमेरिकेत प्रत्येकाला मास्क घालण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. परंतु अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, ते मास्क घालणार नाही. यापूर्वी संशोधनात असे म्हटले होते की, कोरोना रूग्णाची काळजी घेत असलेल्या लोकांनाच मास्क आवश्यक आहेत. परंतु आता नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, ते अत्यंत धोकादायक आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने मास्क घालणे गरजेचे आहे. ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, सध्या ते नवीन सल्लागारला स्वीकारणार नाही.

2 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू
यावेळी अमेरिकेत वाढत्या मृत्यूच्या आकडेवारीमुळे स्वत: अमेरिकन प्रशासनाने कोरोना साथीच्या आजारामुळे सुमारे 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तविली आहे. वास्तविक, अमेरिकेत कोरोना विषाणू संसर्गाची प्रवृत्ती बदलत असल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला कोरोना विषाणूबद्दल हे प्रसिद्ध झाले की विषाणूचा संसर्ग विशेषतः वृद्ध आणि त्या रूग्णांसाठी धोकादायक आहे. ज्यांची काही मेडिकल हिस्ट्री आहे. न्यूयॉर्कमध्ये अचानक तरुणांमध्ये संसर्ग होण्याच्या घटना उद्भवल्यामुळे खळबळ उडाली आहे.